शेतकऱ्यांवर अन्याय का?; उद्योजकांच्या कर्जमाफीवरून राहुल गांधी यांचा सवाल, शेगावमध्ये काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन

शेगाव : शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने आत्महत्या करीत आहेत, तर उद्योजकांचे हजारो कोंटीचे कर्ज माफ केले जात आहे. उद्योजकांना कर्जमाफी मिळत असेल तर शेतकऱ्यांना का नाही, असा सवाल करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आत्महत्येस सरकारचे चुकीचे धोरणच कारणीभूत असल्याची टीका शुक्रवारी केली. शेगाव येथील सभेत त्यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले.

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान शेगाव येथील सभेच्या निमित्ताने काँग्रेसने मोठे शक्तिप्रदर्शन केले. या सभेत ‘भारत जोडो’ यात्रेची गरज अधोरेखित करत राहुल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर दिला. ‘‘शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे. या भागांत सहा महिन्यांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामागची कारणे काय होती, याची उत्तरे कोणत्याही शेतकऱ्याशी चर्चा केली तरी मिळतील. शेतमालाला योग्य भाव नाही. विम्याची रक्कम भरूनही नुकसान भरपाई मिळत नाही. ५० हजार, एक लाख रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात. आमचे एक लाखाचे कर्ज माफ होत नाही, पण उद्योजकांचे शेकडो कोटींचे कर्ज माफ कसे होते, असा सवाल शेतकरीच करीत आहेत’’, असे राहुल गांधी म्हणाले.

‘‘शेतकऱ्यांचे प्रश्न याआधीही होते. काँग्रेस राजवटीत आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून एक पॅकेज जाहीर केले. त्यातून त्यांना दिलासा मिळाला. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी मनात आणले तर ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देऊ शकतात. पण, त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका राहुल यांनी केली. दोन दिवसांपासून स्वा. सावरकरांवरील टीकेवरून वादंग निर्माण झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शेगावच्या भाषणात सावरकर यांच्याबाबत भाष्य टाळले. सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

‘‘भारत जोडो यात्रेची गरज काय, असे विरोधक विचारत आहेत. आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपने द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रसार केला आहे. त्याविरोधात भारत जोडो यात्रेची गरज आहे. या यात्रेचा उद्देश ‘मन की बात’ करण्याचा नव्हे, तर जनतेचा आवाज ऐकण्याचा, त्यांचे दु:ख समजून घेण्याचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

सावरकरांबाबत शिवसेना आणि काँग्रेसची मते वेगवेगळी आहेत. परंतु, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी केला. ‘‘भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रतिसाद आणि प्रेम काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. बिरसा मुंडा हे ब्रिटिशांसमोर झुकले नाहीत, असे सांगताना राहुल गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील काही पक्ष आणि संघटना नाहक वातावरण तापवत आहेत, असा आरोप रमेश यांनी केला. राहुल यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले होते.

देशातील युवक बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात मोफत शिक्षण मिळत नाही. मुलांचे पालक शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करतात. पण, त्यानंतरही मुलांना रोजगार मिळत नाही. युवकांचे स्वप्न पूर्ण न होणारा भारत आम्हाला नको. स्वप्न पूर्ण करणारा भारत आम्हाला हवा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply