शिवसेनेत अंतर्गत वाद अन् ठाकरे यांनी घेतले 2 नगरसेवकांचे राजीनामे:पाणीपट्टीत वाढ करण्याच्या मुद्द्यावरून पेटलेला वाद थेट पोहोचला हाेता ‘मातोश्री’पर्यंत

मी महापालिका बोलतेय... आतापर्यंत मी आपल्याला सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील कुरघोडीचं राजकारण सांगितलं. शिवसेना, भारतीय जनता पक्षातील संघर्षही आपण पाहिला, पण मला आता आठवते ती गोष्ट आहे शिवसेनेतील अंतर्गत वादाची. शिवसेनेचे विकास जैन महापौर असताना घडलेलं हे प्रकरण. सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्ट्याच्या मुद्द्यावरून आणि इतर काही ठरावांवरून शिवसेनेमध्ये हा वाद पेटला. उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी वाढवण्याचा ठराव आला होता. हा मुद्दा केवळ एक निमित्त ठरला. खरंतर तेव्हा पाणीपट्टी वाढलीच नाही, पण वाद या मुद्द्यावर असल्याचं वरवर दाखवण्यात आलं. सभागृह नेते अंबादास दानवे यांनी विकास जैन यांची कोंडी केली. त्यांना सुदाम सोनवणे यांचीही साथ होती. बरेच दिवस त्यांच्यातील संघर्ष मिटला नाही. ‘त्यांना म्हणजे दानवे आणि सोनवणे यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,’ असं जैन उघडपणे बोलले होते. त्यावर ‘हा पक्षातील अंतर्गत विषय आहे. आम्ही त्यातून तोडगा काढू,’ असं सोनवणे यांनी सांगितलं होतं. स्थानिक पातळीवर वाद मिटंना. अखेरीस प्रकरण थेट उद्धव ठाकरे यांच्याकडं गेलं. त्यांनी तिघांनाही मुंबईला बोलवून घेतलं. मुंबईत जाताना त्यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी नगरसेवकही होते. कुणी काय बोलायचं हे सर्व ठरलेलं होतं. मात्र, ऐनवेळी ठाकरे यांच्या पवित्र्यामुळे अंतर्गत धुसफूस ‘मातोश्री’वर उघड झाली. दानवे आणि सोनवणे यांना स्थानिक नेत्यांनीही साथ दिली नाही. पक्षानं दोघांनाही राजीनामा द्यायला सांगितलं होतं. विशेष म्हणजे पक्षाने राजीनामा घेतलेले हे पहिले दोन नगरसेवक. त्यानंतरच्या काळातही शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद होतच राहिले. मात्र, सोनवणे आणि दानवे यांना झालेली शिक्षा लक्षात घेता बऱ्याच जणांनी स्थानिक पातळीवरच वाद मिटवण्यात धन्यता मानली. दानवे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांची शिवसेनेतून पीछेहाट सुरू होईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात त्यांनी जिल्हाप्रमुख पद मिळवलं आणि ते कायम आपल्याकडं ठेवत ही चर्चा फोल ठरवली. नंतर तर ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही झाले. सध्याच्या निवडणुकीची सूत्रं दानवे यांच्याकडंच आहेत. महत्त्वाचे म्हणजे दानवे आणि सोनवणे यांचे राजीनामे कोणत्या कारणामुळे घेतले हे गुलदस्त्यातच आहे. मनपात सर्वात प्रभावी काम करणारे प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्ष त्यांनी कधी उघड होऊ दिला नाही. अंतर्गत वादात न पडता नंदकुमार घोडेले यांनी मात्र दोन वेळा महापौरपद मिळवलं. शिवसेनेनं आमदारकीची उमेदवारी नाकारल्यानंतर प्रदीप जैस्वाल अपक्ष म्हणून लढले. पुढं यांनी शहर विकास आघाडी स्थापन करत मनपा निवडणूक लढवली. त्यांनी काही नगरसेवक निवडूनही आणले. या शहरात स्वतःच्या बळावर काही नगरसेवक निवडून आणणारे ते एकमेव स्थानिक नेते म्हणावे लागतील. एकूणच काय तर वेळप्रसंगी संघर्ष करावा, पण राजकारणात टिकून राहावं हा संदेश महापालिकेच्या राजकारणातच मिळतो. मग ते उदाहरण दानवेंचं असो किंवा जैस्वाल यांचं...

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *