शासनाच्या जमीनीवर घरे बांधून देण्याचे आमिष; 200 कोटींची फसवणूक

पुणे : शासनाकडून घेतलेल्या जमीनीवर घरे बांधून देण्याचे आमिष दाखवून नागरीकांकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांना संबंधित ठिकाणी घरे न देता दोघांनी सभासद व शासनाची तब्बल 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात सोसायटीच्या अध्यक्षासह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास दत्तात्रय गोटे (वय 70, रा.शिवणे, मुळ रा. शिरुर), गणेश बजरंग माने (वय 42, रा.जोशी वाडी, शिरुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिपक अशोक वेताळ (वय 40, रा.मोशी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लेबर कॉन्ट्रॅक्‍टर आहे, तर अंबादास गोटे हा बांधकाम व्यावसायिक तर, माने हा नोकरदार आहे. गोटे हा रामनगर सहकारी गृहरचना संस्थेचा अध्यक्ष, तर माने हा सचिव आहे. त्यांनी वारजे माळवाडी येथील रामनगर परिसरामध्ये 1990 मध्ये नागरीकांना घरे बांधण्यासाठी राज्य सरकारकडून सुमारे साडे चार एक जमीन घेतली होती. त्यासाठी त्यांनी फिर्यादी व त्यांच्यासह अन्य काही व्यक्तींना संबंधित ठिकाणी घरे बांधून देतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून 1990 पासून फिर्यादी व अन्य 218 सभासदांकडून पैसे घेतले. दरम्यान, संबंधित जमीनीवर 396 सदनिका बांधून त्या सोसायटीच्या सभासदांना न देता, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्याच व्यक्तींना विकल्या. त्याद्वारे सोसायटीचे मुळ सभासद व राज्य शासन यांची सुमारे 200 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. गोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनास व न्यायालयास वेळोवेळी खोटी माहिती देऊन त्यांचीही दिशाभुल केली. या गुन्ह्यात गोटे यास त्याच्या अन्य नातेवाईक व इतर व्यक्तींनीही मदत केली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असा अर्ज फिर्यादीने पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिला होता. त्यानुसार, संबंधित अर्जाची चौकशी करुन वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply