विधान परिषद निवडणूक : विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापासून आपल्या राजकीय पूनर्वसनाची ते वाट पाहत होते. मात्र आता ते आमदार म्हणून विधान परिषदेत जाणार असून याबाबत त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी निवडून येऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. मात्र राष्ट्रवादी पक्षाने माझे राजकीय पुनर्वसन केले. भाजपा पक्षातील काही आमदारांनीदेखील मलं मतं दिली, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

“महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मी येऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र माझ्या विजयामुळे त्यांना चांगली चपराक बसली आहे. विजयासाठी जो कोटा हवा होता त्यापेक्षा अधिक मतं मला मिळाली. ही अधिकची जी मतं आहेत ती भारतीय जनता पक्षाकडून मिळाल्याचा मला विश्वास आहे. कारण राष्ट्रवादीची मतं ५१ होती. मात्र आम्हाला ५८ मतं मिळाली. यापैकी २९ मतं मला मिळाली आहेत. ही आगावीची मतं मला भाजपाकडून मिळाली,” असा दावा खडसे यांनी केला.

तसेच, “राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी मला संधी दिली. या संधीचं मी सोनं करेन. पूर्वीपेक्षाही मला अधिक बोलायला संधी आहे. वेळही आहे. त्यामुळे पक्षाच्या सूचनेप्रमाणे मी अधिक चांगलं काम करेन,” असेदखील खडसे म्हणाले.

“मागील सहा वर्षांपासून मला राजकीय जीवनात छळ झाला. मंत्रिपदावर असताना माझ्यावर अनेक आरोप झाले. मी भूखंडामध्ये गैरव्यवहार केला, माझ्या पीएने लाच घेतली, असे आरोप केले गेले. माझा दाऊदशी संबंध जोडला गेला. माझ्या जावयाने गाडी घेतल्याचा आरोप झाला. मात्र या आरोपांमध्ये तथ्य नाही हे समोर आले. एवढ्यावर माझा छळ थांबला नाही. माझी ईडीकडून चौकशी केली गेली. माझ्या जावयाला अटक करण्यात आलं. माझ्या बायकोला, दोन्ही मुलींना तसेच मला समन्स पाठवण्यात आले. माझी संपत्ती जप्त करण्यात आली. तीन आठवड्यांपूर्वी माझी राहते घरे मोकळी करावीत असा आदेश ईडीच्या माध्यमातून करण्यात आला. मला बेघर करण्यात आले. माझ्या अकाऊटंवरचे सर्व पैसे काढून घेण्यात आले. माझा अजूनही छळ थांबलेला नाही. मात्र मी संघर्ष करत आलो. मला जनतेचा आशीर्वाद आहे,” असेदेखील खडसे म्हणाले.

तसेच, “राजकीय विजनवासात जाण्याची स्थिती असताना मला राष्ट्रवादीने हात दिला. मला तिकीट देऊन माझं राजकीय पुनर्वसन केलं. त्यामुळे आगामी काळात पक्षाचा विस्तार करणे, त्यांची प्रतिष्ठा वाढवणे यासाठी मी माझा अनुभव कामी लावेल,” अशी ग्वाही खडसे यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply