विधान परिषद निवडणूक : ‘…म्हणूनच त्यांनी पराभवाची स्क्रीप्ट अगोदरच तयार केली,’ चंद्रकांत पाटलांचा नाना पटोलेंना टोला

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. मतदानाला काही तास शिल्लक राहिलेले असताना मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांतील एका पक्षाचा उमेदवार पराभूत होणार असे भाकित भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच संबंध, संवाद हा बाजारात विकत घेता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना ते कमावलेलं आहे, असा टोलादेखील त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. ते आज सकाळी पत्रकारांशी बोलत होते.

विजयी आकडा नसताना उमेदवार उभा केला जातोय. भाजपाकडून पैशाची गणितं जुळवली जात आहेत, असा आरोप भाजपावर होत आहे. याच आरोपावर बोलताना “पैशाच्या जीवावर कामं करण्याची ज्यांना सवय लागली आहे, त्यांना पैसाच दिसतो. संबंध, संवाद बाजारात विकत घेतला जात नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पाच वर्षे सरकार चालवताना संबंध निर्माण केले आहेत. हेच सगळे संबंध आता उपयोगी पडत आहेत,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

केंद्रीय संस्थांकडून आमदारांना फोन येत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. या आरोपांवर बोलताना, “हा कांगावा आहे. त्यांचा पराभव होणार हे स्पष्ट झाल्यामुळे ते पराभवाची स्क्रीप्ट तयार करत आहेत. त्यांनी ही स्क्रीप्ट अगोदरच तयार केली आहे,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून केला जातोय. या दाव्यावर बोलताना “आमदार संपर्कात असल्याने काय होतं. भापजाचा प्रत्येक कार्यकर्ता हा देश प्रथम, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी स्वत: असा विचार करणारा आहे. आमच्यापैकी अनेकांचे एकनाथ खडसे तसेच इतरांशी नाते आहे. मात्र नात्यांपेक्षाही कर्तव्य वर जातं. त्यामुळे आमचा एकही आमदार संबंध, नातं याचा विचार न करता पक्षनिष्ठा जपणार आहे,” असे बोलून चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या दाव्याला खोडून काढले.

तसेच शेवटी तीन घटक पक्षांमधील एका पक्षाचा एक उमेदवार पडणार आहे. कोणाचा उमेदवार पडणार हे निकाल लागल्यावर कळेलच, असेदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply