नवी दिल्ली: लेफ्टनंट जनरल मनोज पांडे होणार देशाचे नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली: देशाच्या लष्करप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे लष्कराचे २९ वे प्रमुख म्हणून पदभार घेतील. मनोज पांडे हे 'कोर ऑफ इंजिनीअर्स'चे पहिलेच अधिकारी असतील, जे लष्कर प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळतील. ते जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची जागा घेतील. नरवणे यांचा २८ महिन्यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपणार आहे.

संरक्षण मंत्रालयाने सोमवारी याबाबत घोषणा केली. सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, असं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. पांडे हे नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना डिसेंबर १९८२ मध्ये कोर ऑफ इंजिनीअर्समध्ये सहभागी करून घेतले होते. मनोज पांडे यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर आणि पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनीअर रेजिमेंट म्हणून नेतृत्व केले होते.

डिसेंबर २००१ मध्ये संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 'ऑपरेशन पराक्रम'ला सुरुवात झाली होती. त्या अंतर्गत पाकिस्तानला लागूनच असलेल्या पश्चिम सीमेवर जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर होते. पांडे यांनी आपल्या ३९ वर्षांच्या सेवाकाळात पश्चिम थिएटरमध्ये एक इंजिनीअर ब्रिगेड, एलओसीसह भूदल सैन्याचे ब्रिगेड, लडाखमध्ये माउंटेन डिव्हिजन आदी प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply