लखनौ PUBG मर्डर : आईच्या हत्येचा पश्चात्ताप नाही, मृत्यूदंडाची शिक्षा भोगण्याची माझी तयारी; मुलाचं उत्तर ऐकून दंडाधिकारी संतापले

लखनऊनध्ये पबजी खेळण्यास विरोध केल्याने मुलाने आईची हत्या केल्यानंतर याप्रकरणात आता आणखी धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. १६ वर्षीय मुलाने ४ जूनला वडिलांच्या पिस्तुलने आईची गोळ्या घालून हत्या केली होती. यानंतर मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. बालसुधारगृहात पाठवण्यात आल्यानंतर मुलाने तेथील मुलांशी बोलताना आईची हत्या केल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे.

मुलाने दंडाधिकाऱ्यांना सांगितलं की, “जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते आणि माझी त्यासाठी तयारी आहे. मी पिस्तूलने माझ्या आईची हत्या केली असून रात्रभर मित्रांसोबत पार्टीदेखील केली”.

बालसुधारगृहातील कर्मचाऱ्याने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं की, “जेव्हापासून मुलगा इथे आला आहे तेव्हापासून चविष्ट जेवण देण्याची मागणी करत आहे. तो वारंवर या प्रकरणात पोलिसांची चूक असल्याचं सांगत आहे. पोलिसांची चुकी असल्यानेच आपण जेलमध्ये आहोत असं तो म्हणत आहे. पण तो आपल्या गुन्ह्याची कबुलीदेखील देत आहे आणि पोलिसांनी येथे पाडून योग्य काम केल्याचंही म्हणत आहे”.

दंडाधिकाऱ्यांनी मुलाला आईची हत्या का केली? तुला भीती वाटत नाही का? अशी विचारणा केली. यावर मुलाने “आपल्याला भीती वाटत नाही. जास्तीत जास्त फाशीची शिक्षा दिली जाईल आणि त्यासाठी माझी तयारी आहे,” असं सांगितलं. मुलाने उत्तर दिल्यानंतर दंडाधिकारी संतापले आणि त्यांनी पोलिसांना रिमांड मागण्यास सांगितलं. यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

हत्येनंतर रात्री भेटण्यासाठी बाहेर गेला होता

मुलाच्या लहान बहिणीने कुटुंबीयांना सांगितलं की, आईची हत्या केल्यानंतर तो रात्री दोन वाजता गाडीवरुन कोणाला तरी भेटण्यासाठी गेला होता. पोलिसांनी मात्र याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. कुटुंबीय हत्येमध्ये चुकीच्या पद्धतीने मुलाला अडकवण्यात आल्याचा दावा करत आहे.

पबजीची खोटी गोष्ट रचण्यात आली?

कुटुंबीयांना पबजीची खोटी गोष्ट रचली असल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या तपासावर आपण समाधानी नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. एका नातेवाईकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पोलिसांनी पबजीची गोष्ट रचली असून आम्हाला ती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही असं म्हटलं आहे.

मुलाने आपल्या मित्राला पाच हजारांची ऑफर देत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी धमकावलं होतं. पण त्याने नकार दिला होता. यानंतर मुलाने आपल्या मित्रांसोबत पार्टी केली आणि क्रिकेटदेखील खेळला. त्याची आई नेहमी यासाठी विरोध करत होती.

७ जूनला मुलाने आपल्या वडिलांना व्हिडीओ कॉल करत आईचा मृतदेह दाखवला होता. तसंच आईच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूलदेखील दाखवली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply