राष्ट्रपती निवडणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट, दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे. तिसऱ्या फेरीत मुर्मू यांना वैध मतांपैकी ५० टक्के मते मिळाल्यामुळे देशाच्या आगामी राष्ट्रपतीपदी त्या विराजमान होणारे हे स्पष्ट झाले. दरम्यान या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुर्मू यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुर्मू यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुर्मू या एनडीए पुरस्कृत उमेदवार असल्यामुळे त्यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी मुर्मू यांना मतदान करणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधींचे आभार मानले. तसेच “मुर्मू यांनी मंत्री तसेच आमदार म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे. झारखंडच्या राज्यपाल असताना त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पडली होती. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतरही त्या देशविकासाच्या प्रवासात देशाचे नेतृत्व करतील, याचा मला विश्वास आहे,” असे मोदी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांपैकी ५० टक्के मते मिळाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अधिकाधिक पाठिंबा मिळावा म्हणून मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी देशभर दौरे केले होते. मात्र या निवडणुकीमध्ये मुर्मू यांचा विजय झाला. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply