राज्य सरकारच्या सागरी गस्तीच्या बोटींच्या दुरुस्तीवेळी जुन्या व बनावट मालाचा वापर

पुणे : राज्य शासनाने सागरी गस्तीसाठी खरेदी केलेल्या बोटींच्या दुरुस्तीच्यावेळी परदेशातून आयात केलेल्या जुन्या इंजिनांमधील सुटे भाग या बोटींना बसविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी शासनाची सव्वा सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने तीन कंपन्यांच्या संचालकांसह शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी वडाळा पोलिसांकडे वर्ग केला आहे.

याप्रकरणी बिनतारी संदेश व दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन ॲक्वारस शिपयार्ड प्रा. लि. कंपनीचे कार्यकारी संचालक रत्नाकर दांडेकर, या कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, गोवा शिपयार्ड कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि ब्रिलियंट सीगल प्रा. लि. चे अधिकारी, कर्मचारी व संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडुन सागरी गस्तीसाठी बोटीचा वापर केला जातो. अशा २९ बोटींची देखभाल व दुरुस्तीचा करार २०१४ ते २०१९ या कालावधीत गोवा शिपयार्ड कंपनीबरोबर झाला होता.

या कंपनीकडून १६ बोटी ॲक्वारस शिपयार्ड कंपनीला दुरुस्तीसाठी देण्यात आल्या, तर १३ बोटी ब्रिलियंट सीगल प्रा. लि. या कंपनीला दिल्या होत्या. गोवा शिपयार्डकडून संबंधित कंपन्यांना विभागून उपकंत्राट देण्यात आले होते. दरम्यान, बोटींची दुरुस्ती करताना परदेशातून आयात केलेल्या जुन्या इंजिनातील सुटे भाग नवीन असल्याचे भासवून बसविण्यात आले. शासनाच्या नियमानुसार जुने सुटे भाग भांडारात जमा करणे आवश्यक असताना या कंपन्यांकडून जुने सुटे भाग जमा करण्यात आले नाहीत. संबंधित कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून न्यायालयात स्वतंत्र दावाही दाखल करण्यात आला आहे. बिनतारी संदेश व दळणवळण विभागाचे राज्याचे कार्यालय पुण्यात आहे. त्यामुळे चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो मुंबईतील वळाडा पोलिस ठाण्याला वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई कार्यालयातील अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी केली होती. या चौकशीत देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या संबंधित कंपनीतील अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय आधिकारी, कर्मचारी दोषी आढळून आल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply