“राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी…”; राऊतांविरोधातील कारवाईचा उल्लेख करत सेनेचा भाजपावर हल्लाबोल

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली.  राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केल्यावर आधी राऊत यांच्या निवासस्थानी आणि नंतर बेलार्ड पिअर येथील ईडीच्या कार्यालयात बऱ्याच तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना अटक करण्यात आली. राऊत यांच्याविरोधात करण्यात आलेली ही कारवाई राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर पडदा टाकण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. राऊत यांच्यावरील कारवाईचा संबंध शिवसेनेनं राज्यपालांनी मराठी भाषिकांसंदर्भात केलेल्या वक्तव्याशी जोडत शिवसेनेनं भाजपावरही टीका केली आहे.

“राज्यपाल हे एक घटनात्मक आणि प्रतिष्ठेचे पद आहे. अनेक राज्यपालांनी या पदाची प्रतिष्ठा राखत काम केले. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल मात्र यास अपवाद ठरले आहेत. गेल्या साधारण तीनेक वर्षांपासून भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राजभवनात आहेत. या काळात त्यांनी महाराष्ट्र सेवेपेक्षा भाजपा सेवाच जास्त केली, पण शुक्रवारी तर त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, अस्मितेवरच घाव घातला,” अशी टीका शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केलीय.

“राज्यपालांनी आता असे तारे तोडले की, ‘‘मुंबई आणि ठाण्यातून गुजराती व राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर तुमच्याकडे पैसाच उरणार नाही. तुम्ही या मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता, पण गुजराती आणि राजस्थानी लोक इथे नसतील तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हणवताच येणार नाही.’’ राज्यपालांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. लोकांच्या मनात संताप निर्माण झाला आहे. राज्यपालांचे हे विधान महाराष्ट्राचा अपमान करणारे आहे व एकतर राज्यपालांनी माफी मागावी किंवा केंद्राने त्यांना परत बोलवावे, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली, पण त्यातही अपवाद आहेच. भारतीय जनता पार्टी व सरकारमधील शिंदे गटाने मात्र राज्यपालांच्या मराठीद्रोहावर नाममात्र तोंड उघडले. ते त्यांच्या स्वभावास व लौकिकास धरूनच आहे,” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

राज्यपालांनी केलेलं विधान आणि त्यावरुन होणारा वाद टाळण्यासाठी संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचा आरोपही शिवसेनेनं केलाय. “महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी मराठी माणूस व महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्रात त्या विधानावरून संतापाचा भडका उडाला. तो भडका व रोष कायम असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ‘ईडी’ने रविवारी पहाटे धाडी टाकून राज्यपालांच्या भीषण वक्तव्यावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला. हे अपेक्षित होतेच. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी महाराष्ट्रात अशा कारवाया सुरू केल्या तरी लोकांच्या मनातील भडका विझणार नाही,” असं या लेखात म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply