मुंबई:  हनुमान चालीसा म्हणतो, आमच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा: देवेंद्र फडणवीस

मुंबई: खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी 'मातोश्री' निवासस्थानी 'हनुमान चालीसा' म्हणण्याच्या दिलेल्या आव्हानानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसेना असा वाद पेटला होता. नाट्यमय घडामोडींनंतर राणा दाम्पत्याविरोधात दुसऱ्या दिवशी राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान दिलं आहे. आम्हीही हनुमान चालीसा  म्हणतोय, आमच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, असं थेट आव्हान फडणवीस यांनी दिलं. यावेळी फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा पठण केली.

मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. भोंग्याच्या मुद्द्यावरून आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला राज्याच्या गृहमंत्र्यांनी निमंत्रण दिलं होतं. परंतु, ज्या काही घटना गेल्या चार-पाच दिवस मुंबई आणि महाराष्ट्रात घडत आहेत, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारनं संवादासाठी जागा ठेवलीय असं आम्हाला वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले. जर कोणी हिटलर प्रवृत्तीनं वागायचं ठरवलं असेल तर, संवादापेक्षा संघर्ष बरा, अशी मानसिकता झाल्यामुळं आम्ही या बैठकीवर बहिष्कार घातला आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुळातच विरोधी पक्षाला संपवण्याची अशा प्रकारची प्रवृत्ती सरकारची असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर पोलिसांसमक्ष हल्ले करणार असतील, तसेच त्यानंतर एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर, अशा परिस्थितीत बैठकीला जाऊन फायदा काय? असा सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच बघितली नाही. सरकारमधील पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून, जीवघेणा हल्ला करतात. पोलखोल यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आम्ही जनतेकडे मांडला. लोकशाहीत यापेक्षा वेगळं काय करायचं असतं. ज्यांना लोकशाही मान्य नाही. त्यांनी पोलखोल रथावर हल्ला केला. अशा प्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं बंद करू असं जर वाटत असेल तर हा गैरसमज मनातून काढून टाका. भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply