मुंबई : समुद्रातील जहाजातून डिझेलची तस्करी करणाऱ्या दोन बोटींना आग

नवी मुंबई - समुद्रातील जहाजातून डिझेलची तस्करी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व नवी मुंबई पोलिसांनी जानेवारी महिन्यात पकडलेल्या २ बोटींना बुधवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना बेलापूर येथील जेटीत घडली. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली असली तरी यात एक बोट पूर्णपणे खाक झाली आहे. या बोटींना आग लागली की लावली? याबाबत संशय व्यक्त होत आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जानेवारीत मुंबई शिधावाटप विभाग व राज्यस्तरीय दक्षता पथकासह उलवे येथील खाडीमध्ये छापेमारी करून डिझेलच्या तस्करीसाठी वापरलेल्‍या दोन बोटी पकडल्या होत्या. यावेळी दोन्ही बोटीच्या वेगवेगळ्या कप्प्यात एकूण १६ लाख १० हजार रुपये किमतीचे २१ हजार ४७० लिटर डिझेल आढळले होते. कारवाईत पाच जणांना अटक केली होती. पोलिसांनी दोन्ही बोटी जप्त करून बेलापूर जेटीवर ठेवल्या होत्या.

बोटींमध्ये काही प्रमाणात डिझेल आणि ऑईल असल्याने तत्काळ पेट घेतला. आगीची माहिती मिळताच सीबीडी येथील महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र बोटींमध्ये डिझेल असल्याने दोन्ही बोट आगीच्या भक्षस्थानी पडल्या. आगीत एक बोट पूर्णपणे खाक झाली असून दुसरी बोट वाचविण्यात आल्याची माहिती अग्‍निशमन दलाचे साहाय्यक केंद्र अधिकारी आर. जी. चौधरी यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply