मुंबई:  राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, आता BMC ने बजावली नोटीस

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सध्या राणा दाम्पत्य तुरुंगात असून, त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेनं (BMC) नोटीस बजावली आहे. नोटिशीनुसार, खार येथील इमारतीतील राणांच्या घरात मुंबई महापालिकेकडून पाहणी केली जाणार आहे. घरात अवैध बांधकाम केल्याचा संशय पालिका प्रशासनाला आहे. वाढीव बांधकाम आणि काही नियमांचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून महापालिकेनं ही नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी महापालिकेचे एक पथक पाहणी करण्यासाठी खार येथील त्यांच्या निवासस्थानी जाणार आहे. 

सध्या तुरुंगात असलेले नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर ४ मे रोजी निर्णय दिला जाणार आहे. कोर्टात निकालाचे वाचन पूर्ण न झाल्याने राणा दाम्पत्याला दोन दिवस कोठडीतच राहावं लागलं. त्यांच्या जामीन अर्जावर ४ मे रोजी निर्णय दिला जाणार आहे. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्याला दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य हे मुंबईत आले होते. मात्र, शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरच तळ ठोकला होता. शिवसैनिकांकडूनही राणा दाम्पत्याला आव्हान दिलं होतं. पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये, म्हणून पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांना निवासस्थानाहून ताब्यात घेतलं होतं. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्य कोठडीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply