मुंबई :  राज ठाकरे हे स्वयंभू नेते; कोणाच्या सांगण्यानुसार ते वागत नाहीत – प्रवीण दरेकर

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरुद्ध घेतलेल्या आक्रमक पवित्र्याबाबत भाजपकडून देखील राज ठाकरेंच्या या भूमिकेचे समर्थन सुरु आहे. २ मे रोजी राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये पार पडलेल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा जाहीरपणे मशिदींवरील भोंगे  उतरवण्याबाबत जाहीरपणे भाष्य केले. ३ मे पर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी राज्यभरातील सर्वच मशिदीच्या मौलानांना दिला आहे. ३ मे रोजी भोंगे उतरवण्यात आले नाहीत तर ४ मे पासून आम्ही ऐकणार नाही असा इशाराही राज ठाकरे ठाकरेंनी दिलाय.

राज ठाकरेंच्या या भूमिकेचे जोरदार समर्थन भाजपाकडून (BJP) सुरु आहे. औरंगाबादच्या सभेत भाषणादरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणे म्हणजेच हि अतिरेकी कारवाई असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील निवासस्थानी दरेकर यांनी हि प्रतिक्रिया माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले, "राज ठाकरे हे स्वयंभू नेते आहेत. त्यामुळे ते कोणाच्या तरी सांगण्यावरून वागत असतील असे वाटत नाही. राज ठाकरे यांच्यावर भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, आज हिंदुत्ववादी जनता व समाज या सरकारच्या स्वार्थी पणाला बघत आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाला जनप्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे काय होणार? अश्या विवंचनेतून तसेच राजकीय हेतूने प्रेरित या कारवाया सुरु आहेत."

भोंग्याचा प्रश्न हा राजकीय नसून सामाजिक आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सातत्याने हा विषय मांडला आहे. त्यामुळे हा विषय काही आताच नाही. राज ठाकरेंनी नव्याने घेतलेल्या या भूमिकेमुळे काही मंडळींची धावपळ झालेली आहे असा टोला दरेकर यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला. तसेच, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन हे सरकार करत नसून, कायदा हा सर्वाना समान असतो तो मुस्लिमांना वेगळा हिंदूंना वेगळा असा होत नाही. मात्र, या सरकारमधील अहंभावना जागृत झाली असून अलीकडच्या काळात भाजप नेत्यांवर देखील सूडभावनेतूनच या सरकारने कारवाया केल्यात आणि तशीच कारवाई राज ठाकरे यांच्यावर करण्यात आली असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply