मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रतन टाटांची भेट

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रतन टाटा यांनी एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. तसंच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मागील सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिला जात असल्याने अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यासंबंधी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी “जी कामं अगदी शेवटी, घाईत मंजूर केली त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. इतर अत्यावश्यक कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही,” असं सांगत अधिकारी नाराज असल्याचं वृत्त फेटाळलं. सरकार बदललं म्हणून कोणतीही लोकहिताची, अत्यावश्यक, विकासकामं रद्द होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिलं आहेत असं सांगितलं. मात्र पक्षप्रमुख उल्लेख केला नसल्याच्या प्रश्नावर भाष्य करणं त्यांनी टाळलं.

मुख्यमंत्र्यांच्या स्थगिती धोरणाला अधिकाऱ्यांकडून आक्षेप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या विविध निर्णयांना स्थगिती देण्याचे धोरण सुरू केल्याने प्रशासनात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. स्थगिती धोरणामुळे विकासकामांना खीळ बसण्याबरोबरच न्यायालयीन प्रकरणांचा ससेमिरा मागे लागू शकतो, अशी ठाम भूमिका विविध सचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मंगळवारी मांडली. त्यानंतर काही विभागांच्या अत्यावश्यक कामांवरील स्थगिती उठविण्यात आली.

उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे. “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना,” असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव ठाकरेंचा उल्लेख असाच केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply