मुंबई : भाजप सत्तेत येताच राज्यपालांमधील ‘रामशास्त्री’ जागा! ; विधानसभेत विरोधी नेत्यांची बोचरी टीका

मुंबई : आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी करीत होतो, त्यांनी ते मान्य केले नाही, मात्र सत्ताबदल होताच, त्यांच्यातील रामशास्त्री प्रभुणे जागा झाला, आणि अध्यक्ष निवडीला परवानगी दिली, अशी बोचरी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेत केली.

राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदपर ठरावावर बोलताना काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी  राज्यपालांवर टीका केली. आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी  विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला मान्यता देण्यासाठी  मंत्र्यांचे शिष्टमंडळ तीन वेळा राज्यपालांना भेटले होते, तरीही त्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत निवडणुकीला परवानगी दिली नाही. आता भाजपपुरस्कृत सरकार येताच, त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास परवानगी दिली. राज्यपालांमधील रामशास्त्री प्रभुणे झोपले होते, आता सत्ताबदल झाल्यावर जागे झाले आहेत, अशी  टीका थोरात यांनी केली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी परवानगी द्या, अशी आम्ही वारंवार राज्यपालांना विनंती करीत होतो, परंतु त्यांनी ते ऐकले नाही. मात्र आता त्यांनी ऐकले. त्याबद्दल राज्यपालांचे आभार मानतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हाणला. राज्यपालांनी आता विधान परिषदेसाठी आम्ही पाठवलेल्या १२ आमदारांच्या नावांना तात्काळ मान्यता द्या, म्हणजे राज्यपाल हे सर्वाशी समान वागले हे दाखवण्याची त्यांना ही शेवटची संधी आहे, असा चिमटा त्यांनी काढला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply