मुंबई : पोटनिवडणुकांमध्ये भाजपचे वर्चस्व; काँग्रेसची पाटी कोरी, प्रादेशिक पक्षांना तीन जागा

मुंबई : सहा राज्यांमधील सात विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये चार जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. गतवेळच्या तुलनेत भाजपला एका जागा अधिक मिळाली, तर काँग्रेसला दोन जागा गमवाव्या लागल्या. शिवसेना तेलंगण राष्ट्र समिती आणि राष्ट्रीय जनता दल या प्रादेशिक पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली.

 महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, ओदिशा, तेलंगण, हरयाणा या सहा राज्यांमधील सात मतदारसंघांत पोटनिवडणुकांसाठी ३ नोव्हेंबरला मतदान झाले. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये सत्तांतरानंतर पोटनिवडणुका होत असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले होते. सातपैकी सर्वाधिक चार जागा भाजपने जिंकल्या. उर्वरित तीन जागांमध्ये प्रत्येकी एक जागा  शिवसेना, तेलंगण राष्ट्र समिती आणि राष्ट्रीय जनता दलाला मिळाली. पोटनिवडणुकांपूर्वी भाजप तीन, काँग्रेस दोन, शिवसेना आणि राष्ट्रीय जनता दलाकडे प्रत्येकी एक जागा होती. भाजपने तीन जागा कायम राखल्याच, पण त्याबरोबरच हरयाणामधील एक अतिरिक्त जागा जिंकली. काँग्रेसला तेलंगण आणि हरयाणामधील दोन्ही जागा गमावल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रीय जनता दलाने आपल्या जागा कायम राखल्या आहेत. 

 महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये अलीकडे सत्तांतर झाले. म्हणजेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दोन मतदारसंघांत पोटनिवडणूक झाली. भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाने आपल्या जागा कायम राखल्या. बिहारमधील गोपाळगंज मतदारसंघातील जागा भाजपने दोन हजारांच्या मताधिक्याने जिंकली. एमआयएमच्या उमेदवाला मिळालेली १२ हजार तर बसपला मिळालेली ८ हजार मते भाजपच्या पथ्थ्यावर पडली. दुसऱ्या मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने १६ हजार मतांनी विजय प्राप्त केला. भाजपचे मताधिक्य कमी झाले असले तरी जागा कायम राखण्यात यश मिळाले.  तेलंगणातील पोटनिवडणूक कमालीची चुरशीची झाली. काँग्रेस आमदाराने राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या दोन वर्षांत झालेल्या दोन मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपने विजय प्राप्त केला होता. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना राजकीय शह देण्याची भाजपची योजना होती. परंतु, पोटनिवडणुकीत तेलंगण राष्ट्र समितीने ही जागा १० हजारांहून अधिक मतांनी जिंकली. काँग्रेस उमेदवाराला २५ हजारांच्या आसपास मते मिळाली. तेलगंणातील ही पोटनिवडणूक मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासह भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. तेलंगण राष्ट्र समितीला विजय मिळाल्याने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला राजकीय फायदा होणार आहे. हरयाणात माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या पुत्राने काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पोटनिवडणुकीत भजनलाल यांच्या नातवाने भाजपच्या वतीने विजय प्राप्त केला. काँग्रेसला ही जागाही गमवावी लागली. उत्तर प्रदेश व ओदिशात भाजपने जागा कायम राखल्या आहेत.

काँग्रेसला फटका

मल्लिकार्जुन खरगे यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यावर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. तेलंगण व हरयाणातील जागा पक्षाला कायम राखता आलेल्या नाहीत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पक्षाचे उमेदवारच रिंगणात नव्हते. हरयाणा आणि तेलंगणातील जागा पक्षाच्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर पक्षाला गमवाव्या लागल्या.

सहा जण घरातलेच..

सातपैकी सहा मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या घरातील सदस्य पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. त्यास फक्त तेलंगणाचा अपवाद ठरला. उत्तर प्रदेश, हरयाणा आणि ओदिशात लोकप्रतिनिधींची मुले, तर महाराष्ट्र, बिहारमधील दोन्ही जागांवर त्यांच्या पत्नी विजयी झाल्या आहेत. 

निकाल असा..

  • महाराष्ट्र – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • बिहार जागा २ – भाजप आणि राष्ट्रीय जनता दल
  • उत्तर प्रदेश – भाजप 
  • ओदिशा – भाजप 
  • तेलंगण – तेलंगण राष्ट्र समिती 
  • हरयाणा – भाजप


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply