मुंबई : गणिताच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, नोकरीची संधी; दर वर्षी २५ हजार विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बारावी परीक्षा गणित विषयात किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी पुढील उच्च शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून देणारी मिलाप ही योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. शालेय शिक्षण विभाग व एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनीशी करार करण्यात आला असून, या योजनेंतर्गत चालू शैक्षणिक वर्षांत २५ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे, त्याची नोंदणी सुरू करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली.

शिक्षण घेता घेता नोकरी आणि पदवी प्राप्त करून देणारी ही ‘महाराष्ट्र यंग लिडर्स अस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ ( मिलाप) या नावाने ही योजना सुरू करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरिवद सावंत, स्थानिक आमदार राहुल नार्वेकर, शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत एचसीएल व ईएन पॉवर या कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले.

विद्यार्थी तंत्रज्ञान, कौशल्य विकास यात कुठेही मागे राहू नयेत, यासाठी एचसीएल टेक्नॉलॉजी या जागतिक दर्जाच्या कंपनीमार्फत गणित विषयात ६० टक्के गुणांसह १२ वी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहा महिन्यांनंतर त्यांना प्रत्यक्ष कंपनीत काम करण्याचीदेखील संधी मिळणार आहे. पहिल्या वर्षांत २५ हजार विद्यार्थ्यांना संधी मिळणार असून, त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वर्षां गायकवाड यांनी दिली.

या योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एचसीएल कंपनीमार्फत सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपनीत थेट नोकरी मिळणार आहे. नोकरी करत त्यांना चार वर्षांत अभियांत्रिकी पदवी प्राप्त करता येणार आहे. एकाच वेळी प्रशिक्षण, नोकरी व पदवी प्राप्त करून देणारी ही योजना आहे, असे सर्वशिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले. प्रशिक्षण काळात महिना १० हजार रुपये विद्यावेतन व नोकरी सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षांत २ लाख २० हजार रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply