मुंबई : कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं; विनायक राऊतांचा आरोप

मुंबई - भाजप नेते मोहित कंबोज यांच्या कारवर 'मातोश्री' परिसरात कलानगरच्या सिग्नलवर जमावानं हल्ला केल्याची घटना रात्री घडली. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर यावर आता शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते मोहित कंबोज हे रेकी करण्याच्या हेतूनेच मातोश्रीबाहेर आले होते असा पुनरुच्चार विनायक राऊत यांनी केला आहे. मोहित कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं होती असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.

मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी हल्ला करण्यात आला होता. भाजपनेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाड्यांचा ताफा मातोश्रीसमोरून जात असताना शिवसैनिकांकडून कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळील कलानगर सिग्नलजवळ हा हल्ला करण्यात आला आहे. हनुमान चालीसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर कंबोज यांच्याकडून मातोश्रीची रेकी केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी आपल्या म्हणण्यावर ठाम राहत मोहित कंबोज रेकी करण्यासाठीच आले होते, असा आरोप केला आहे.

कंबोज यांच्या कारवरील हल्ल्याच्या घटनेनंतर स्वतः त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी एका लग्नसोहळ्याहून घरी जात होता. कलानगर सिग्नलवर कार थांबली असता, शेकडोच्या जमावानं कारवर हल्ला चढवला. त्यानंतर या सर्व प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कंबोज यांच्या कारवरील हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर, तुम्हाला जीवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही, असं फडणवीस म्हणाले. आता मुंबई पोलीस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच. या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची आमची मागणी आहे, असंही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply