मुंबई :  एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर? राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपदे, केंद्रात ३ मंत्रिपदांची शक्यता

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्या गटात एकेक आमदार जात आहे. तर दुसरीकडे खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपदे, तर केंद्रात २ मंत्रिपदे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून ही ऑफर दिली गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, बुधवारी संध्याकाळी राज्यातील जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं. 'तुम्ही राज्याचा कारभार चालवण्यास पात्र नाहीत, असं एकाही बंडखोर आमदारानं समोरासमोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपद आणि शिवसेना पक्षप्रमुख सोडतो, असं थेट आव्हान दिलं होतं. त्यानंतर त्यांनी जाहीर केल्याप्रमाणं काल रात्रीच मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान वर्षा बंगला सोडून ते 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी गेले.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे एकेक आमदार जात आहेत. जवळपास ४० आमदार हे शिंदे गटात गेल्याचा दावा केला जात आहे. तसेच काही खासदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे कळते. त्यामुळे सत्ता समीकरणाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

तसेच वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपकडून आता शिंदे गटाला ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. सरकार स्थापन करायचा झाल्यास शिंदे गटाला राज्यात आठ कॅबिनेट मंत्रिपदे आणि पाच राज्यमंत्रिपदे देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर केंद्रात दोन मंत्रिपदे देणार असल्याची माहिती समजते.

एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्री करतील अशी चर्चा असून, राज्यात एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करू शकतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तसेच महामंडळांवरही शिंदे गटातील आमदारांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply