मुंबई : एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी आज, गुरुवारी (३० जून २०२२) राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

राजभवनात हा छोटेखानी शपथविधी सोहळा झाला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी ही शपथ घेतो, अशी सुरुवात करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

जवळपास ९ दिवसाच्या राजकीय सत्तासंघर्षानंतर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशिरा आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला. त्यानुसार आज सकाळी शिंदे हे गोव्याहून थेट मुंबईत आले.

त्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांच्या सागर या बंगल्यावरती गेले. तेथून ते राजभवनावर जाऊन राज्यपालांनाजवळ सत्तास्थापनेचा दावा केला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे अंदाज वर्तविण्यात येत होते. मात्र, राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस आणि शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.

यामध्ये फडणवीसांनी अनपेक्षित असा निर्णय दिला की राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान होणार आणि त्यानुसार आता शिंदे यांनी शपथ घेतली. मात्र, यावेळी आपण मात्र, राज्य सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये नसणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आदेश देताच त्यांनी देखील आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपनेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजप नेते आणि मान्यवर उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply