मुंबईत हवेचा दर्जा सुधारला: हवा गुणवत्ता निर्देशांक ‘मध्यम’

मुंबई : मुंबईतील उष्मा काहीसा कमी झाल्यानंतर प्रदूषणाची पातळीही काही प्रमाणात खाली आली आहे. मुंबईतील हवेचा दर्जा  ‘तीव्र प्रदूषणा’वरून सुधारला असून हवेच्या दर्जाची ‘मध्यम’ नोंद झाली आहे. मुंबई शहरात आज हवा गुणवत्ता निर्देशांक १२१ नोंदवला गेला. हवेच्या दर्जाचीही ‘मध्यम’ अशी नोंद झाली आहे. भांडुप आणि वरळीमध्ये प्रदूषणाचा स्तर सुधारला असून तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे ८४ व ८० सह ‘समाधानकारक’ नोंदवला गेला. कुलाबा, बोरिवली, बीकेसी आणि चेंबूरमधील प्रदूषणाची पातळी मागच्या तुलनेत कमी झाली आहे. कुलाबा ११३, बोरिवली ११५, बीकेसी ११० आणि चेंबूर १०८ अशा हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा दर्जा ‘मध्यम’ नोंदवला गेला. मालाड, माझगाव आणि अंधेरीमध्ये मात्र प्रदूषणाची समस्या कायमच आहे. तेथील हवेचा दर्जा अद्याप ‘वाईट’ आहे. मुंबईतील सर्वाधिक प्रदूषण पश्चिम उपनगरातील अंधेरी भागात नोंदवले गेले. मालाड २१५, माझगाव २३५ व अंधेरी २७३ असा हवा गुणवत्ता निर्देशांक असून तेथील हवेचा दर्जा ‘वाईट’ नोंदवला गेला आहे. मुंबईवरील वाळूच्या वादळांचा परिणाम कमी झाला असून सध्या समुद्राकडून जमिनीकडे हवा वाहत आहे. त्यामुळे जमिनीलगतचे धूलिकण वाहून जात आहेत. त्या कारणाने हवेचा स्तर काहीसा सुधारला असून आठवडाभर ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. - गुफारन बेग, प्रकल्प संचालक, सफर.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply