मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब, वायू प्रदूषणात प्रचंड वाढ;

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ करणारी बातमी आहे. मुंबईतील हवेचा दर्जा घसरला असून हवा प्रचंड दुषित झाली आहे. अहवालानुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. मुंबईत काही ठिकाणी हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाने 300 चा टप्पा ओलांडला तर काही ठिकाणी 200 चा टप्पा ओलांडला, ही पातळी अत्यंत खराब मानली जाते. 

चिंताजनक बाब म्हणजे, मुंबईतील हवा प्रदूषणात दिल्ली पेक्षाही जास्त वाढ झाली आहे. मुंबईचा AQI पातळी खराब असल्याचे नोंदवले आहे.सोमवारी मुंबईची एकूण AQI पातळी 225 नोंदवण्यात आली. तर दिल्लीची एकूण AQI पातळी 152 होती. ही आकडेवारी SAFAR ची आहे ज्याने मुंबईची AQI पातळी खराब असल्याचे नोंदवले आहे.

तथापि, मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या AQI पातळीची नोंद झाली. मालाडमधील हवेची गुणवत्ता 311 होती जी अत्यंत खराब आहे. त्यापाठोपाठ मांढगाव आणि चेंबूरमध्ये 303 होते. वांद्रे-कुर्ला येथे AQI पातळी 269 नोंदवण्यात आली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, काही दिवसांपूर्वी मुंबईतील हवेची गुणवत्ता 168 (मध्यम) आणि दिल्लीतील 218 (खराब) होती. आता SAFAR च्या आकडेवारीत मुंबईतील हवा दिल्लीपेक्षाही जास्त खराब असल्याचं समोर आलं आहे.

आता CPCB आणि SAFAR च्या आकडेवारीत फरक का आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर, SAFAR ची शहरातील नऊ ठिकाणी निरीक्षण केंद्रे आहेत तर CPCB 18 स्थानांवर आधारित एकूण AQI मोजते. दुसरीकडे, सीपीसीबीची दिल्लीत 36 वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्रे आहेत.

मुंबईतील प्रदूषणवाढीची कारणे कोणती?

काही दिवसांपूर्वी, G20 शेरपा अमिताभ कांत आणि महापालिका आयुक्त इकाबाल सिंह चहल यांच्यात मुंबईतील हवा प्रदुषणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली होती. त्यावेळी चहल यांनी मोठ्या प्रदूषणासाठी रिफायनरीज आणि टाटा पॉवर प्लांटला जबाबदार धरले होते. याशिवाय ढगाळ वातावरण आणि वाहनांच्या अतिवापरामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply