मुंबईः मृत भावाच्या ठेवी हडप केल्याच्या आरोपाखाली महिलाविरोधात गुन्हा

मुंबई : गेल्यावर्षी करोनामुळे मृत्यू झालेल्या भावाची आयुष्यभराची बचत खात्यातील रक्कम हडप केल्याच्या आरोपाखाली चारकोप पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृत व्यक्तीच्या पत्नीने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतल्यानंतर याप्रकरणी पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आरोपी महिलेला मदत केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षक, वकील, बँक कर्मचारी यांच्यावरही गुन्हा दाखल केला.

तक्रारदार महिला जे. अँथनी(४९) या व्यवसायाने शिक्षिका असून गेल्या २२ वर्षांपासून त्या ओमानमध्ये काम करतात. त्यांचे पती ॲम्ब्रोस अँथनी हे देखील मस्कतमध्ये काम करत होते. त्यांची मुले भारतात राहतात. या कुटुंबाची मालाड पश्चिम येथे सदनिका असून तक्रारदार व त्यांचे पती वर्षातून एक-दोनदा या घरी यायचे. तक्रारीनुसार, एप्रिल २०२१ मध्ये तक्रारदार यांच्या पतीला भारतात असताना करोना झाला होता. त्यांना मालाड (पश्चिम) येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अँथनी १३ एप्रिल २०२१ रोजी ओमानहून आपल्या पतीची काळजी घेण्यासाठी भारतात आल्या होत्या. मात्र, २१ एप्रिल २०२१ रोजी त्यांच्या पतीचा करोनामुळे मृत्यू झाला.पतीचे अंत्यविधी पडल्यानंतर अँथनी यांच्या हातातील त्यांच्या पतीचा मोबाइल आरोपी बहिण जेनिफर एटकेन फरेरा हिने हिसकावून घेतला. फरेराने पतीचा लॅपटॉप, बँकेचे पासबुक, पासपोर्ट, फिक्स डिपॉझिटची कागदपत्रे, राडो कंपनीचे घड्याळ इत्यादी गोष्टी लपवून ठेवल्याचा ॲंथनी यांना संशय होता. हे सर्व तिला देण्यास नकार दिल्याने अँथनी यांचे फरेरा यांच्याशी भांडण झाले. त्यानंतर फरेराने तिच्या पतीच्या बँक खात्यातून एटीएम कार्डचा वापर करून, फसवून पैसे काढले आणि स्वतछच्या बँक खात्यात ते भरल्याचे अँथनी यांच्या लक्षात आले.

ॲंथनी यांनी केलेल्या तक्रारीनुसार बहिण फरेराने ॲम्ब्रोस यांच्या मृत्यूबाबतची माहिती बँकेला न देता त्यांच्या खात्यातून पैसे काढले. फरेराने तिच्या मृत भावाचा मोबाइल फोन वापरला, तसेच तिच्या भावाने दोन मुदत ठेवींमधीलही रक्कम काढली. तिने एकूण ३४ लाख ५८ हजारांच्या मुदत ठेवी वैयक्तिक खात्यावर हस्तांतरीत केल्या. तसेच अँथनी यांनी तक्रार केल्यानंतर त्यांच्या मुलासोबत संयुक्त खात्यात २४ लाख रुपये हस्तांतरीत केले, असा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे.

बँकेच्या महिला कर्मचाऱ्यानेही फरेराला या कथित फसवणुकीत मदत केल्याचा आरोप अँथनी यांनी केला आहे. तसेच अँथनी यांनी त्यांचे वकील व एका पोलीस उपनिरीक्षकावरही फसवणूकीत मदत केल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अखेर फरेरा, पोलिस उपनिरीक्षक, वकील आणि बँक कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply