मिरा-भाईंदरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर

भाईंदर : मिरा-भाईंदर शहर आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळायला सुरुवात झाल्यानंतर शनिवारी (ता. १९) प्रथमच शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून शहरात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या शून्य होती. परिणामी सक्रिय रुग्णांची संख्याही गेल्या अनेक दिवसांपासून १०च्या आतच होती. मात्र शनिवारी पहिल्यांदाच ती शून्य झाली आहे. भारतात कोरोनाची लाट सुरू झाल्यानंतर मिरा-भाईंदरमध्ये २९ मार्च २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण मिरा रोडमध्ये सापडला होता. आता सुमारे दोन वर्षांनंतर शहरामधील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या शून्य झाली आहे. शनिवारी भाईंदर पश्चिम, पूर्व आणि मिरा रोडमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नाही आणि शहरातील सक्रिय रुग्णांची संख्याही शून्य झाली. यावर्षी जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेत मिरा-भाईंदरमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. ७ जानेवारीला एकाच दिवशी शहरात आजपर्यंतचे सर्वाधिक १०७२ रुग्ण आढळून आल्यामुळे आणि सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन हजारांच्याही पुढे गेल्यामुळे थोडे भीतीचे वातावरण होते. मात्र त्यातही दिलासा देणारी बाब अशी होती, की त्यातील ८५ टक्के रुग्ण लक्षणे नसल्यामुळे घरातच विलगीकरणामध्ये होते; तर रुग्णालयात अवघे पाचशे ५०० रुग्णच उपचार घेत होते. मात्र तिसरी लाट जानेवारी महिन्याच्या अखेरीस ओसरली आणि आता मार्चमध्ये ती शून्यावर आली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply