माझी हत्या होऊ शकते; कोर्टात नेण्यापूर्वी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंचा पुन्हा दावा

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी, शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं होतं. या आक्रमक आंदोनलासाठी वकील गुणरत्न सदावर्ते जबाबदार असल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं. सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांच्या गाडीतून नेत असताना "माझ्या जीवाला धोका असून माझी हत्याहोऊ शकते" असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. तसेच "एका वकिलाच्या अधिकारांवर गदा आणली जात असून लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा" आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. यावेळी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आंदोलनातील अन्य १०३ जणांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. या १०३ आंदोलकांना यलोगेट पोलिस ठाण्यातूून कोर्टात नेण्यात आलं. यावेळी पोलिसांनी दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठा फौजफाटा तैनात केला, त्यामुळे किल्ला कोर्टाला छावणीचं स्वरूप आलं होतं. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील-सदावर्ते यादेखील कोर्टात उपस्थित होत्या. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी 7 एप्रिलला केलेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कामगार भडकले. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सदावर्ते यांनी आम्ही 'शरद पवार' यांच्या घरात जाऊन जाब विचारू असे म्हणत एसटी कामगारांना चिथावनी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याबाबतच्या एफआयआरमध्ये ही माहिती उघड झाली. याचप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply