महाराष्ट्रातील असंही एक गाव…जिथं धार्मिक स्थळांवर लाउडस्पीकर, भोंगेच नाहीत!

नांदेड : धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. दुसरीकडं राज्यात असं एक गाव आहे, जिथं धार्मिक स्थळी भोंगे आणि लाउडस्पीकरच नाहीत. नांदेड जिल्ह्यातील बारड या गावानं पाच वर्षांपूर्वीच धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं बारडची ओळख सामाजिक सलोखा जपणारं गाव अशी झाली आहे.

गुढीपाडव्याला मुंबईत मनसेचा मेळावा झाला. या मेळाव्यात पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. अनधिकृत भोंगे उतरवा, अन्यथा हनुमान चालीसा भोंग्यावर लावणार असा इशारा ठाकरे यांनी दिला होता. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दुसरीकडं, सामाजिक सलोखा जपणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील बारड गावची चर्चा सुरू झाली आहे. १५ हजार लोकसंख्येच्या या गावात धार्मिक स्थळांवर भोंगे आणि लाउडस्पीकरच नाही. पाच वर्षांपूर्वीच या गावानं धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचा निर्णय घेतला.

बारड (Barad) गावची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास आहे. या ग्रामपंचायतीनं २०१८ मध्येच ठराव घेतला आणि धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा निर्णय घेतला. इतकंच काय तर, गावात राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम किंवा शैक्षणिक कार्यक्रम असला तरी, भोंगे न लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे, असे उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले.

भोंगे हटवण्याच्या ग्रामपंचायतीनं घेतलेल्या निर्णयाचे गावातील सर्वधर्मीय नागरिकांनी स्वागत केले. मशिदी, मंदिरांवरील भोंगे हटवले. यामुळे गावात वाद होत नाहीतच, शिवाय, ध्वनीप्रदूषणही होत नाही, असे मौलवी मोहम्मद रजा आणि पुजारी यशवंत लोमटे यांनी सांगितले. राष्ट्रीय एकात्मेचं दर्शन घडवणाऱ्या बारड गावचा आदर्श इतरांनी घेतल्यास राज्यातील सामाजिक सलोखा जपण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply