भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडेंवर कारवाई व्हायलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांचं नाव दोषारोपपत्रातून काढून टाकण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे. त्याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांचं नाव दोषारोप पत्रातून काढून टाकल्यानंतर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या प्रतिक्रिया दिली आहे. ते सोलापूर येथे माध्यमांशी बोलत होते.

यावेळी आठवले यांनी म्हटलं की, भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचं नाव वगळण्यात आलं असलं तरी त्यांची सखोल चौकशी करून सबळ पुरावे शोधावे. भिडे गुरुजींवर कारवाई होण्याबाबत आपण आग्रही आहोत. रामदास आठवले सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली आहे.

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातून संभाजी भिडे यांचं नाव वगळण्यात आल्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता आठवले म्हणाले की, “भिडे गुरूजींवर कारवाई व्हायला पाहिजे, ही आपली मागणी कायम आहे. भिडे गुरुजींविरोधातील ठोस पुरावे तपास यंत्रणेला मिळाले नसतील, म्हणून त्यांचं नाव वगळलं गेलं असेल. पण तरीही त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आपण ठाम आहोत. त्यासाठी भिडे गुरुजींची आणखी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी आठवले यांनी केली.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात भिडे यांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ४१ आरोपीं विरोधात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यात भिडे यांचं नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून मानवी हक्क आयोगापुढे झालेल्या सुनावणी दरम्यान नुकतीच देण्यात आली. संभाजी भिडे यांचा हिंसाचार प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचं आढळून आल्याचं पोलिसांनी मानवी हक्क आयोगापुढे सांगितलं. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटात हिंसाचार झाला होता. या प्रकरणात संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply