बेकायदा दस्तनोंदणी, नको रे बाबा!

पुणे - बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिकांची दस्तनोंदणी करणारे खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या दोघांपुढील अडचणी  वाढणार आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने अशा दस्तांवर असलेल्या सदनिका खरेदीदार आणि विक्री करणारे या दोघांची नावे पोलिसांना कळविली जाणार आहेत. बनावट एनए ऑर्डर आणि भोगवटापत्र यांच्या मदतीने शेकडो सदनिकांची नोंदणी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने ५७ बनावट ‘एनए ऑर्डर’, तर महापालिकेच्या नावावर ३७ बनावट भोगवटा पत्र अशा सुमारे शंभरहून अधिक केसेस तपासणीत आढळून आल्या आहेत, याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने सर्वप्रथम दिले. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकरणांची संख्या किती आहे, हे जाणून घेण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयांची तपासणी सुरू केली आहे. दरम्यान या विरोधात विभागाकडून पोलिस कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी आढळलेल्या १०० प्रकरणांतील प्रत्येक दस्तावर असलेल्या सदनिका विक्री करणार व खरेदी करणारे यांची नावे पोलिसांना कळविली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लेखी तक्रारीकडे दुर्लक्ष वारजे परिसरात महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी आणि भोगवटापत्र दाखवून सदनिकांची विक्री केली जात असल्याचे यापूर्वीच उघडकीस आले होते. त्यासंदर्भात महापालिकेकडे देखील तक्रारी दाखल झाल्या होत्या. महापालिकेने शहानिशा केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचे दिसून आल्यानंतर बांधकाम विभागाने डिसेंबर महिन्यात वारजे पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी विनंतीही पोलिसांना केली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर असे प्रकार करणाऱ्यांची संख्या वाढतच गेली असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply