बारामती : १८ व २४ मीटर रुंदीच्या दोन रिंग रोडचे काम वेगाने सुरु

बारामती : शहरातील अवजड वाहतूकीचा ताण कमी व्हावा व बाहेर जाणा-या वाहनांना शहरात यावे लागू नये या उद्देशाने बारामती शहराबाहेर दोन रिंग रोडचे काम सध्या वेगाने सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूकीचा ताण कमी व्हावा या उद्देशाने महत्वाच्या रस्त्यांना जोडणारे अठरा व चोवीस मीटर रुंदीचे दोन रिंग रोड प्रस्तावित केले होते. या पैकी पाटस रस्ता- मोरगाव रस्ता- जामदार रस्ता- नीरा रस्ता ते फलटण रस्ता हा चोवीस मीटर रुंदीचा चार पदरी होणार आहे. या मध्ये दुभाजक टाकण्यात येणार असून यात पाटस रस्ता ते क-हा नदी, क-हा नदीवर मोठ्या पूलाचे बांधकाम करणे, पुन्हा क-हा नदी ते मोरगाव रस्ता, मोरगाव रस्ता ते लेंडी नाला, लेडी नाला ते जामदार रस्ता, जामदार रस्ता ते नीरा रोड व नीरा रोड ते फलटण रोड असा हा 4800 मीटर लांबीचा रस्ता असेल. एक वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित असून या साठी 15 कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे. अवजड वाहनांची सगळी वाहतूक याच रस्त्यावरुन वळविली जाणार आहे, त्या मुळे ज्या वाहनांना पाटस रस्त्यावरुन मोरगाव किंवा नीरा किंवा फलटण रस्त्यावर जायचे असेल त्यांना हा रस्ता सोयीस्कर पडेल. दुसरीकडे मोरगाव रस्ता ते लेंडी नाला व लेंडी नाल्यावर लहान पूलाचे बांधकाम करणे, पुन्हा लेंडी नाला ते जामदार रस्ता, जामदार रस्ता ते नीरा रस्ता व नीरा रस्ता ते फलटण रस्ता असा 18 मीटर लांबीचा 2500 मीटर लांबीचा दुसरा रिंग रोड साकारणार आहे. हलक्या वाहनांची वाहतूक या दोन पदरी रस्त्यावरुन होईल या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या दोन्ही रस्त्यांच्या मुरुमीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर असून त्या नंतर खडीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती अभियंता अमोल पवार यांनी दिली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply