बंडखोर गट आणि शिवसेना आज कोर्टात आमनेसामने, एकनाथ शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेत नेमकं काय आहे?

शिवसेनेने एकनाथ शिंदे तसेच ४० बंडखोर आमदारांना खिंडीत गाठण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब सुरु केला आहे. शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदाराचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली असून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना पक्षाचे कोणतेही निर्णय घेता येऊ नयेत म्हणून त्यांना गटनेते पदावरुन बाजूला सारून हे पद अजय चौधरी यांना देण्यात आले आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही आक्रमक पवित्रा धारण केला असून शिवसेनेच्या या दोन्ही निर्णयांवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून हे निर्णय रद्द करावेत अशी मागणी केली आहे. आज १०.३० वाजता या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेत नेमकं काय आहे?

शिंदे यांनी शिवसेनेने निवडलेला गटनेता तसेच आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीवर आक्षेप घेतला आहे. २१ आणि २२ जून अशा दोन दिवसांच्या बैठकांना आमदारांनी उपस्थित राहण्याचे व्हीप जारी करण्यात आले होते. पण व्हिप विधिमंडळ कामकाजाशिवाय इतर गोष्टींना लागू होत नाही, असे शिंदे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. तसे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

तसेच, २१ जून रोजी शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी २४ आमदारांच्या बैठकीत अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली. पण त्याच दिवशी ५५ आमदारांपैकी एकूण ३४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदीच्या निवडीवर विश्वास व्यक्त केला. अजय चौधरी यांची निवड अवैध आहे. अजय चौधरी यांनी दिलेल्या पत्रानुसारच आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी कायद्यानुसार सात दिवसांचा वेळ मिळणे गरजेचे. पण आम्हाला अवघ्या ४८ तासांत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे, असेदेखील एकनाथ शिंदे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. आपली बाजू मांडण्यासाठी दोन्ही बाजूंनी दिग्गज वकील नेमले आहेत. एकनाथ शिंदे यांची बाजू निष्णात वकील हरिश साळवे मांडत आहेत. तर शिवसेनेचे बाजू ज्येष्ठ वकील कपील सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी मांडणार आहेत. त्यामुळे या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply