बंगळूरु :  रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : लक्ष्य.. रणजी जेतेपद क्र. ४२ ; अंतिम सामन्यात मध्य प्रदेशशी गाठ

बंगळूरु : मुंबईच्या ४२ व्या रणजी करंडक क्रिकेट जेतेपदाच्या मार्गात मध्य प्रदेशचा अडथळा उभा आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईचे पारडे जड आहे.

जेतेपदाशिवाय आम्हाला दुसरा कोणताच पर्याय मान्य नाही, हे मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी खेळाडूंवर बिंबवले आहे, तर अमोल मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या संघाने संपूर्ण हंगामात वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात मुझुमदार आणि पंडित या मुंबईकर प्रशिक्षकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

मुंबईच्या फलंदाजीचा नावलौकिक यंदाच्या कामगिरीतूनही पुन्हा प्रत्ययास आला. सर्फराज खानने सातत्यपूर्ण फलंदाजीचे प्रदर्शन करीत फक्त पाच सामन्यांत ८०० हून अधिक धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) राजस्थान रॉयल्सकडून छाप पाडणाऱ्या युवा यशस्वी जैस्वालने गेल्या चार सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत. यापैकी उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यातील खणखणीत शतके लक्षवेधी होती. कर्णधार पृथ्वी शॉ हा मुंबईच्या खडूस फलंदाजीच्या परंपरेतील नसला, तरी वीरेंद्र सेहवागप्रमाणे गोलंदाजांवर त्वेषाने आक्रमण करतो. काका वसिम जाफरचा वारसा चालवणारा अरमान संयमी फलंदाजी करतो. सुवेद पारकर, हार्दिक तामोरे यांनी संधीचे सोने केले.

याशिवाय डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानी (३७ बळी आणि २९२ धावा) आणि ऑफ-स्पिनर तनुष कोटियन (१८ बळी आणि २३६ धावा) यांनी अष्टपैलू योगदान दिले आहे. कठीण प्रसंगात सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता या दोघांमध्ये आहे. गोव्याविरुद्धचा सामना अशाच रीतीने तारला होता.

दुसरीकडे, गेल्या काही वर्षांत कामगिरी उंचावणारा संघ म्हणून मध्य प्रदेश ओळखला जातो. पंडित यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनामुळे हा संघ रणजीच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला आहे. या संघाला वेंकटेश अय्यरची फलंदाजीत आणि वेगवान गोलंदाज आवेश खानची गोलंदाजीत तीव्र उणीव भासेल. डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेयवरा मध्य प्रदेशच्या गोलंदाजीची प्रमुख मदार आहे. हिमांशी मंत्री आणि अक्षत रघुवंशी यांनी फलंदाजीतील आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. असामान्य गुणवत्ता असलेला रजत पाटीदारला वेसण घालण्यासाठी मुंबईच्या गोलंदाजांना योग्य रणनीती आखावी लागणार आहे.

संघ

मुंबई : पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, भुपेन लालवानी, अरमान जाफर, सर्फराज खान, सुवेद पारकर, आकर्षित गोमेल, आदित्य तरे, हार्दिम तामोरे, अमन खान, साईराज पाटील, शम्स मुलानी, ध्रुमिल मटकर, तनुष कोटियन, शशांक अत्तार्डे, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, सिद्धार्थ राऊत, मुशीर खान.

मध्य प्रदेश : आदित्य श्रीवास्तव (कर्णधार), रजत पाटीदार, अनुभव अग्रवाल, अक्षत रघवंशी, अर्शद खान, पुनीत दाते, यश दुबे, गौरव यादव, मिहिर हिरवाणी, सारांश जैन, कुमार कार्तिकेया, हिमांशू मंत्री, ईश्वर पांडे, रमीझ खान, अजय रोहेरा, पार्थ सहानी, कुलदीप सेन, शुमहाम शर्मा, राकेश ठाकूर, पृथ्वीराज सिंग तोमर.

’ वेळ : सकाळी ९.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

मुंबईला पुन्हा जेतेपद मिळवून देऊ -पृथ्वी

बंगळूरु : क्रिकेट म्हणजे आयुष्याचा आरसा असतो. याचा कधी उंचावणारा आणि खालावणारा आलेख कायम असतो, असे मत मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ याने व्यक्त केले. यंदाच्या रणजी हंगामात पृथ्वीने पाच सामन्यांत फक्त तीन अर्धशतके झळकावली. ‘‘कामगिरी काही वेळा अपेक्षेनुसार होत नाही. परंतु मुंबईची कामगिरी उत्तम होत असल्याचे समाधान मला आहे. कर्णधार म्हणून सर्व २१ खेळाडूंचा विचार करावा लागतो. फक्त स्वत:चा विचार करून चालत नाही,’’ असे पृथ्वी म्हणाला. ‘‘आम्ही रणजी करंडक जेतेपदाच्या दृष्टीने पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. बाहेर काय घडते आहे, याकडे अजिबात लक्ष नाही. रणजी स्पर्धा जिंकणे आणि ते आनंददायी क्षण पुन्हा मुंबईच्या क्रिकेटला मिळवून देणे, हेच आमचे ध्येय आहे,’’ असे पृथ्वीने सांगितले.

मुंबईची वाटचाल

* साखळी

१. वि. सौराष्ट्र : अनिर्णित

२. वि. गोवा : ११९ धावांनी विजय

३. वि. ओडिशा : एक डाव आणि १०८ धावांनी विजय

* उपांत्यपूर्व

४. वि. उत्तराखंड : ७२५ धावांनी विजय

* उपांत्य

५. वि. उत्तर प्रदेश : अनिर्णित (पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर विजयी)

४१ मुंबईने सर्वाधिक ४१ वेळा रणजी करंडक जिंकला आहे.

० मध्य प्रदेशने आतापर्यंत एकदाही रणजी स्पर्धा जिंकलेली नाही. परंतु १९८८-८९मध्ये उपविजेतेपद पटकावले होते. त्यावेळी कर्नाटककडून त्यांनी पराभव पत्करला होता.

२ प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी दोन स्वतंत्र रणजी विजेत्या संघांचे (मुंबई, विदर्भ) प्रतिनिधित्व केले आहे.

सर्वाधिक धावा :

* सर्फराज खान (८०३)

* यश दुबे (४८०)

सर्वाधिक बळी :

* शम्स मुलानी (३७)   

* कुमार कार्तिकेया (२७)



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply