पुण्यात हंगामातील नीचांकी तापमान; गारव्यातील वाढ आणखी दोन दिवसच

पुणे : कोरड्या हवामानाची स्थिती आणि निरभ्र आकाशाचा परिणाम म्हणून पुणे शहर आणि परिसरामधील तापमानात शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) मोठी घट नोंदविण्यात आली. शिवाजीनगर केंद्रावर ११.२ किमान तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामात शहरातील हे नीचांकी तापमान ठरले आहे. यापूर्वी ३० ऑक्टोबरला १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाचा नीचांक नोंदविला गेला होता. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहणार आहे. त्यानंतर तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ होऊन गारवा काहीसा कमी झाला होता. किमान तापमान १४ अंशांच्या पुढे गेले होते. मात्र, हवामानात एकदम बदल झाल्याने तापमानात सुमारे तीन अंशांनी घट होऊन ते ११.२ अंशांपर्यंत खाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे तापमान ३.१ अंशांनी कमी आहे. पुणे शहरात यंदाच्या हंगामात सहा वेळा राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ३० ऑक्टोबरला शहरात १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्याच दिवशी हे तापमान राज्यातही नीचांकी होते. त्यानंतर ३ नोव्हेंबरला १३.१ अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. १० नोव्हेंबरला १२.८ अंश सेल्सिअस, ११ नोव्हेंबरला २.८ अंश सेल्सिअस, १२ नोव्हेंबरला १३.४ अंश सेल्सिअस, तर १३ नोव्हेंबरला १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सलग चार दिवस शहरातील तापमानाचा पारा राज्यात नीचांकी ठरला.

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर शहरात आकाश निरभ्र राहणार आहे. मात्र, सध्या बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याचा महाराष्ट्रावर फासरा परिसणाम होणार नसला, तरी तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातही दोन दिवसांनंतर तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन गारवा कमी होणार आहे. दिवसाच्या कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply