पुण्यात वाहतूक विभागासाठी स्वतंत्र अतिरिक्त पोलिस आयुक्त गरजेचे; रितेश कुमार

पुणे : शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या शहराचा विचार करता पुणे पोलिस दलात वाहतूक विभागासाठी स्वतंत्र अतिरिक्त पोलिस आयुक्त असणे गरजेचे आहे. हे पद निर्माण करण्यासाठी आकृतिबंधात बदल सुचविण्यात आले आहेत. त्याचा पाठपुरावा करीत पुणेकरांची वाहतूक कोडी फोडण्यासाठी आवश्‍यक ते सर्व उपाय करण्यात येतील, अशी माहिती नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कुमार यांनी शनिवारी (ता. २४) ‘सकाळ’च्या कार्यालयास भेट दिली. संपादकीय विभागाकडून कुमार यांचे स्वागत करण्यात आले. शहरातील बदललेले गुन्हेगारीचे स्वरूप आणि त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजना याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘शहराच्या बदललेल्या आकारानुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे.

जानेवारी महिन्यात त्याचे परिमाण दिसून येतील. वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी, त्यात अल्पवयीन मुलांचा समावेश, महिला व बालकांची सुरक्षा, रस्त्यावर घडत असलेले गुन्हे अशा बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गुन्ह्यांचे स्वरूप कोणते आहे. त्यानुसार त्यावर उपाययोजना करण्यावर भर आहे. गुन्ह्यात वापरण्यात येत असलेली हत्यारे कुठून येतात, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त कसे करता येर्इल, यावर कायदेशीरदृष्ट्या उपाययोजना करण्यात येत आहे.

मोक्कात आम्ही एक्स्पर्ट

मोक्का कायद्यानुसार कारवार्इ करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे गुन्हे नियंत्रणात आले आहेत. त्यामुळे यापुढे देखील मोक्काची कारवार्इ चालू राहणार आहे. मी यापूर्वी देखील मोक्काबाबतच्या अनेक कारवाया केल्या आहे. त्यात आम्ही एस्पर्ट आहोत, असे कुमार यांनी नमूद केले. मोठे गुन्हे, मध्यम स्वरूपाचे गुन्हे आणि अल्पवयीन आरोपी व महिलांची सुरक्षा अशा तीन टप्प्यांत गुन्ह्यांची विभागणी करून त्यावर काम सुरू करण्यात आले आहे, असे कुमार यांनी सांगितले.

बेसिक पोलिसिंगवर भर

प्रत्येकवेळी पोलिस ठाण्यात बसून पोलिंसिग करता येत नाही. गुन्हे कमी होऊन ते नियंत्रणात राहण्यासाठी पोलिस रस्त्यावर असणे गरजेचे आहे.

त्यामुळे रस्त्यावर उपस्थित रहा, अशा सूचना मी सर्व पोलिसांनी केल्या आहेत. बेसिंग पोलिसिंगवर आमचा भर आहे. कारण पोलिस समाजात असतील तर त्याचा गुन्हेगारांना वचक बसतो. हेच बेसिंग पोलिसिंग आहे, असे कुमार म्हणाले.

कुमार म्हणाले

- गुन्ह्याच्या स्वरूपानुसार उपाययोजना करणार

- गुन्ह्यांची प्रमुख तीन टप्प्यात विभागणी

- अल्पवयीन आरोपींवर कायद्यानुसार योग्य ती कारवार्इ करणार

- मोक्काची कारवार्इ यापुढे देखील सुरू राहणार

- नोकरदार महिलांची सुरक्षा आणखी वाढविणार



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply