पुण्यात भरणार नेटकऱ्यांचा मेळा

पुणे : ‘डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी’ या संस्थेतर्फे दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचे पुण्यात आयोजन करण्यात येत आहे. २९ एप्रिल ते १ मे दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे संमेलन पार पडेल, अशी माहिती आयोजक समीर आठल्ये यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ‘मगरपट्टा सिटी ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, प्लॅनेट मराठीच्या सह-उपाध्यक्षा जयंती वाघदरे, संमेलनाचे आयोजक मंगेश वाघ, प्रदीप लोखंडे, विनायक रासकर हे उपस्थित होते. ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या संमेलनाचे सहआयोजक असून राज्य शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महा आयटी, राज्य मराठी विकास संस्था आदी संस्थांचे संमेलनास सहकार्य लाभले आहे. या संमेलनास प्रवेश विनामूल्य असून फेसबुक व युट्यूबवर याचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. परंतु, कोणत्याही स्वरूपातील (प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन) संमेलनात सहभागी होण्यासाठी www.thesammelan.com या संकेतस्थळावर ऑनलाइन नावनोंदणी करणे अनिवार्य आहे’’, अशी माहिती आठल्ये यांनी दिली.

‘‘मराठीतून व्यक्त होणाऱ्या, वाचणाऱ्या, बघणाऱ्या लोकांची संख्या वाढवणे, सोशल मीडियावरील चर्चांमधून तयार होणारा ताणतणाव प्रत्यक्ष भेटून कमी करायचा प्रयत्न करणे, नवनिर्मितीचा आणि निर्मिती प्रक्रियेचा आनंद जास्तीत जास्त लोकांना मिळवा यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, सोशल मीडियावरील संवादाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, ही मराठी सोशल मीडिया संमेलनाची काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत’’, असे मंगेश वाघ यांनी सांगितले.

Follow us -



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply