पुण्यात गारठा कायम, पावसाची शक्यता; डिसेंबरमधील नीचांकी तापमान

पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (१० डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी डिसेंबरमधील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. तापमानाचा पारा ८.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने रात्री गारठा कायम राहिला. मात्र, पुढील तीन-चार दिवसांत तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून, पावसाचाही अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शहरात शुक्रवारी तापमानाचा पारा एकदमच कमी होऊन १४ ते १५ अंशांवरून थेट ९.४ अंशांपर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे रात्री थंडीचा कडाका वाढला. शनिवारी या तापमानात आणखी घट झाली. त्यामुळे गारठा कायम राहिला आहे. सध्या शहरातील रात्रीच्या किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत २.५ अंशांनी कमी आहे. दिवसा निरभ्र आकाशामुळे कमाल तापमान मात्र ३० अंशांपार गेले आहे. पुढील तीन-चार दिवसांत तापमानात पुन्हा बदल होऊन रात्रीच्या तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचे रूपांतर आता कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. ही प्रणाली महाराष्ट्रावरही परिणाम करणार असून, काही भागांत पावसाची शक्यता आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातही काही भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे. ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत पुणे शहर आणि जिल्ह्यात आकाश ढगाळ होणार असून, काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटाचा इशाराही पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply