पुण्यातील रेंजहिल्स भागामधील लोहमार्गालगतच्या अतिक्रमणांवर २६ एप्रिलला रेल्वेचा हातोडा

शिवाजीनगर ते खडकीदरम्यान रेंंजहिल्स येथे मेट्रोचे काम सुरू असलेल्या भागात लोहमार्गालगत असलेल्या अतिक्रमणांवर २६ एप्रिलला कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. संबंधित अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्याची मुदत यापूर्वी देण्यात आली होती. मात्र, ती पाळण्यात आल्याने आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

खडकी रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्गापासून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या लोहमार्गालगत रेंजहिल्स भागात अनेक वर्षांपासून अतिक्रमणे झालेली आहेत. या भागात सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. या भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी ७ एप्रिललाच रेल्वेकडून नियोजन करण्यात आले होते. त्याबाबतच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या होत्या. मात्र, अतिक्रमणे असलेल्या नागरिकांनी १६ एप्रिलपर्यंत कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. या कालावधीत स्वत:हून अतिक्रमणे काढून घेण्याची तयारीही दर्शविली होती, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.

अतिक्रमणकर्त्यांकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र, अतिक्रमणकर्त्यांनी दिलेल्या मुदतीत स्वत:हून रेल्वेची जमीन मोकळी केली नाही. त्यामुळे २६ एप्रिलला अतिक्रमणे काढण्याची नोटीस संबंधितांना देण्यात आली आहे. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसारच ही कारवाई होत आहे. मात्र, अतिक्रमण केलेल्यांकडून असहकाराची भूमिका घेतली जात आहे. अद्यापही येथील अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा २६ एप्रिलला होणाऱ्या कारवाईत रेल्वे आपली जागा ताब्यात घेईल, असे पुणे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply