पुणे : हायड्रोजन व्हॅली’ पुण्यात? अंमलबजावणीबाबत शास्त्रज्ञ, उद्योग प्रतिनिधींची बैठक

पुणे : स्वच्छ इंधनाचा स्रोत असलेल्या हायड्रोजनचे महत्त्व लक्षात घेऊन ‘हायड्रोजन व्हॅली’ प्रकल्प पुण्यात होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हायड्रोजन व्हॅलीची संकल्पना, आराखडा आणि अंमलबजावणीबाबत शास्त्रज्ञ, उद्योगांची पुण्यात नुकतीच बैठक झाली असून, २०३०पर्यंत देशभरात तीन ‘हायड्रोजन व्हॅली’ उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (डीएसटी) ‘क्लीन हायड्रोजन मिशन’अंतर्गत ‘मिशन इनोव्हेशन’ची घोषणा केली आहे. या अनुषंगाने हायड्रोजन व्हॅलीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, पुणे ज्ञान समूह (पुणे नॉलेज क्लस्टर), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यातर्फे महाराष्ट्रात हायड्रोजन व्हॅली उभारण्याबाबतच्या आराखड्यासंदर्भात बैठक झाली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत शास्त्रज्ञ डॉ. रणजित कृष्ण पै, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, डॉ. प्रीती बन्सल, बिपिन श्रीमली, रश्मी उर्ध्वरेषे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. अजित केंभावी, एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले यांच्यासह उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हायड्रोजन व्हॅली प्रकल्पाअंतर्गत २०२३ ते २०२७ या पहिल्या टप्प्यात छोट्या पातळीवरच्या प्रायोगिक प्रकल्पाद्वारे हायड्रोजन इंधनाचे वर्षाकाठी ५०० टनाचे उत्पादन आणि वापर करण्यात येईल. २०२८ ते २०३३ या दुसऱ्या टप्प्यात हायड्रोजन व्हॅलीतील उत्पादन वाढवून पाच हजार टनांपर्यंत नेण्यात येईल. तसेच सुविधांचा विस्तारही करण्यात येईल. तर २०३४ ते २०५० या तिसऱ्या टप्प्यात कार्बनचा अत्यल्प वापर असलेल्या हायड्रोजन प्रणाली विकसित करणे आणि सिमेंट व स्टीलसारख्या उद्योगांमध्ये त्याचा वापर वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

वाहतूक, रसायने आणि खत उत्पादन अशा उद्योगांसह माहिती तंत्रज्ञान, विदा (डेटा), कोल्ड स्टोअरेज, साखर कारखाने आणि जैव इंधनाचे मोठे प्रकल्प पुणे परिसरामध्ये आहेत. तसेच स्वच्छ इंधनावर संशोधन संस्था आणि त्यावरील उद्योगही पुण्यात असल्याने पुणे देशाचे ‘हायड्रोजन हब’ होऊ शकते, असे मत बैठकीत मांडण्यात आले. महाराष्ट्रात हायड्रोजन व्हॅली करण्यासाठीचे सहकार्य पुणे ज्ञान समूहाकडून करण्यात येणार आहे.

हायड्रोजन व्हॅली म्हणजे काय?
हायड्रोजन व्हॅली हे असे भौगोलिक क्षेत्र आहे, जिथे दळणवळण, उद्योग आणि ऊर्जा अशा एकापेक्षा अधिक क्षेत्रांसाठी हायड्रोजन पुरवला जातो. त्याद्वारे हायड्रोजन इंधनाच्या मूल्यसाखळीची निर्मिती करून हायड्रोजन इंधनाचे उत्पादन, साठवण आणि वहनासाठीच्या पायाभूत सुविधा उभारल्या जातात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply