पुणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटातील तपशिलांबाबत बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबीयांचा आक्षेप

पुणे : चित्रपट निर्मितीसाठी मुभा घेणे (सिनेमॅटिक लिबर्टी) ही काल्पनिक चित्रपटांसाठी घेणे ठीक. मात्र, ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांसाठी ती घेणे योग्य नाही. चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापरही जबाबदारीने होणे अपेक्षित आहे, ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निर्मितीत त्या जबाबदारीचे भान दिसत नाही; तसेच त्यामुळे ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटनाही दाखवण्यात आल्या आहेत, अशा शब्दांत बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी बुधवारी या चित्रपटाबाबत आक्षेप नोंदवला.

बाजीप्रभू देशपांडे हे हिरडस मावळ येथील शिंद या गावी राहत होते. सध्या तेथे वास्तव्य असलेल्या रतन विजय देशपांडे, अमर वामनराव देशपंडे, किरण अमर देशपांडे; तसेच देशपांडे यांच्या भोर येथे स्थायिक असलेल्या वंशजांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन चित्रपटांवरील आक्षेप मांडले. रतन देशपांडे म्हणाल्या, शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंना वरंधा घाटात जासलोलगड किंवा कासलोलगड हा किल्ला वसवण्याची जबाबदारी दिल्याचे पत्र उपलब्ध आहे. प्रत्यक्षात चित्रपटात अनेक ठिकाणी देवळे बांधल्याचे दाखवण्यात आले आहे. बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभू यांनी बांदल देशमुखांच्या सैन्याचे नेतृत्व केले. दोन्ही भावांनी प्राणांची आहुती देऊन शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. मात्र, चित्रपटात दोन्ही भावांच्या लहानपणीच्या कटू प्रसंग दाखवून फुलाजी प्रभू यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचेही रतन देशपांडे यांनी स्पष्ट केले.

चित्रपटात दाखवलेला शिरवळ येथील स्त्रियांचा बाजार, अफजलखान भेटीप्रसंगी बाजीप्रभूंची उपस्थिती अशा गोष्टींचा ऐतिहासिक पुरावा नाही याकडे लक्ष वेधत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो आपल्याला दाखवावा या मागणीलाही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याबाबत नाराजी देशपांडे यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली आहे. देशपांडे कुटुंबीयांनी घेतलेल्या आक्षेपांना चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेतर्फे संपूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply