पुणे : हत्या करायची आणि आत्महत्या दाखवायची, शवविच्छेदनामुळे उघडकीस आले ५ खून

पुणे : आपल्या जवळच्या व्यक्तीचा खून करायचा आणि त्याने आत्महत्या केली, असे बेमालूम चित्र घटनास्थळावर निर्माण करायचे अशा पाच घटना शहरात गेल्या चार महिन्यांमध्ये घडल्या. ‘क्राइम सिन’वर दिसणाऱ्या आत्महत्या या प्रत्यक्षात खून असल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले.

कोरोना उद्रेकाचा काळ आणि त्यानंतरचे काही महिन्यांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण शहरात वाढले होते. पण, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता जवळच्या व्यक्तीचा किरकोळ कारणावरून खून करण्याचे प्रकार वाढल्याचे निरीक्षण ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागातर्फे नोंदविण्यात आले आहे.

पती-पत्नी, वडील-मुलगा, सासरे-सून अशा अगदी जवळच्या नात्यांमध्ये हे खून झाले आहेत. शहरातील कात्रज, सिंहगड रस्ता अशा उपनगरांमध्ये या घटना घडल्या असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली.

या बाबत न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. हरीश ताटीया म्हणाले, “शवविच्छेदनापूर्वी पोलिस पंचनामा केला जातो. तो पंचनामा वाचून आणि मृतदेहाची बारकाईने निरीक्षण केले जाते. शरीरावर दिसणारे व्रण, जखमा आणि पंचनाम्यात नमूद हकिगत यांच्यात तफावत असल्याचे मृतदेहाच्या प्राथमिक निरीक्षणावरून दिसून आले. डोक्यास आणि गळ्यात अंतर्गत जखमा दिसून आल्याने सदर प्रकरणात आत्महत्या नसून खून झाल्याचे निरीक्षणाला दुजोरा मिळाला. काही गुन्ह्यांमध्ये ओढणी किंवा नायलॉनच्या दोरीने व्यक्तीचा गळा आवळल्याचे दिसून आले.”



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply