पुणे : स्वदेशी वस्तूंच्या वापरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जीतो कनेक्ट आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पुणे : स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच, आपण परदेशी वस्तूंचे नकळत मानसिक गुलाम होत आहोत का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने एकत्र बसून दैनंदिन वापरातील वस्तूंची यादी करावी. त्यातील परदेशी वस्तूंच्या जागी स्वदेशी उत्पादनांच्या वापरावर भर द्यावा, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वदेशी वस्तूंच्या वापराचा जोरदार पुरस्कार केला. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास नवउद्योजकांना उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो) पुणे शाखेच्या वतीने आयोजित ‘जीतो कनेक्ट २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी दूरभाष पद्धतीने केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, आमदार माधुरी मिसाळ, उद्योजक प्रकाश धारिवाल, नरेंद्र बलदोटा, विनोद मंडोट, जीतो ॲपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष गणपतराज चौधरी, सुरेश मुथा, उपाध्यक्ष विजय भंडारी, पुणे शाखेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका आणि परिषदेचे समन्वयक राजेश सांकला, मुख्य सचिव पंकज कर्नावट, सचिव चेतन भंडारी, जीतो ॲपेक्सचे उपाध्यक्ष महावीर चौधरी, ॲड एस. के. जैन, अशोक हिंगड, अजित सेठिया, राजेंद्र बाठिया, हितेश शहा या वेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलाताना मोदी म्हणाले, “देशाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवामध्ये प्रवेश केला असून, येत्या २५ वर्षांत स्वर्णिम भारताच्या निर्मितीचा संकल्प केला आहे. त्यासाठी सबका प्रयास हाच गतीशील विकासाचा मंत्र असून, ‘टुगेदर टुवर्ड्स टुमारो’ ही या परिषदेची संकल्पना उपयुक्त ठरणार आहे. जगात शांतता, समृद्धी निर्माण करून जागतिक पुरवठा साखळीचे सक्षमीकरण करण्यासाठी भारताकडे मोठ्या विश्वासाने पाहिले जात आहे.”

तसेच, “देशात प्रतिभा, व्यापार आणि तंत्रज्ञानाला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे दररोज अनेक स्टार्टअपची नोंदणी होत आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेचे नियम मोडीत काढून उपजीविका आणि व्यवसाय सुलभ करण्यात आले आहेत. करप्रणाली पारदर्शक करण्यात आली असून, एक देश, एक करचे स्वप्न साकार होत आहे. उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे नव्या व्यवस्थेवर जनतेचा विश्वास वाढत आहे. सरकारची इच्छाशक्ती आणि जनतेचे सहकार्य असल्यास बदल निश्चित घडतो, हे आपण अनुभवत आहोत,” असेही मोदी यांनी सांगितले. 

तसेच या कार्यक्रमता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील आयात कमी करुन निर्यात वाढवावी लागेल असं मत व्यक्त केलं. “स्वातंत्र्यानंतरची चुकीची आर्थिक धोरणे, भ्रष्टाचारी शासन व दिशाहीन नेतृत्वामुळे देशाचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण आत्मनिर्भर, सुखी, समृद्ध आणि शक्तीशाली भारताच्या निर्मितीचा विचार करत आहोत,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वीच्या सरकारांवर टीका केली. स्वदेशीला चालना देण्यासाठी देशात आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply