पुणे : सत्यशोधक समाजाचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष २४ सप्टेंबरपासून; विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत सत्यशोधक साहित्याचे प्रदर्शन

पुणे : महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष २४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे सत्यशोधक समाजाच्या साहित्याचे प्रदर्शन २४ सप्टेंबरला आयोजित करण्यात आले असून, सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. 

महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामुळे सत्यशोधक समाजाला १४९ वर्षं पूर्ण होऊन दीडशेवे वर्ष सुरू होत आहे. या निमित्ताने विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत पहिल्या मजल्यावरील इंतिहासविषयक संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनात लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतून मिळवलेल्या सत्यशोधक साहित्यासह विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, फर्ग्युसन कॉलेजचे वाडिया ग्रंथालय, शाहू वाचनालय काकडवाडी, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मृती ग्रंथालय, कुकाणे, तसेच खर्डेकर ग्रंथालय, शिवाजी विद्यापीठ अशा विविध ग्रंथालयांमधून आणलेल्या सत्यशोधक साहित्याच्या प्रती, सत्यशोधक विचारांची पुस्तके, वृत्तपत्रे आणि कार्यकर्त्यांची माहिती मांडली जाईल अशी माहिती इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी दिली. डॉ. कुंभोजकर यांना संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून जमा केलेल्या या साहित्याच्या अभ्यासासाठी त्यांना भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे अनुदान प्राप्त झाले आहे. प्रदर्शनासह त्या दिवशी विद्यापीठातर्फे मुख्य इमारतीची वारसा सहल सकाळी अकरा वाजता होईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply