पुणे : शरद पवारांवरील आक्षेपार्ह टीका पडणार महागात, अभिनेत्री केतकी चितळे विरोधात पुण्यात तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्या प्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. अभिनेत्री केतकी चितळेने समाजमाध्यमावर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेच्या माध्यमातून तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, समीर शेख, उदय महाले, गणेश नलावडे, प्रीती धोत्रे आदींनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ॲड. विकास शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्यात ही फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान, ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात देखील केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वप्नील नेटके यांनी दिली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत केतकी चितळे विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल केले आहेत. केतकी चितळेने शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून केतळी चितळेचा निषेध केला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply