पुणे :  व्यसनमुक्ती केंद्रात किरकोळ वादातून एकाचा टॅावेलने गळा आवळून खून ; सिंहगड रस्ता भागातील घटना

पुणे : व्यसनमुक्ती केंद्रात झालेल्या किरकोळ वादातून एकाचा टॅावेलने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना धायरी परिसरात घडली. या प्रकरणी एकाला रात्री उशीरा अटक करण्यात आली.

अजिंक्य सुरेश गुळमिरे (वय ३५ रा. हनुमान गल्ली, सांगोला, जि. सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सौरभ गणेश सावळे (वय २१, रा. किश्किंदानगर, कोथरुड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. धायरीतील लायगुडे इंड्रस्टिअल इस्टेट परिसरात एका संस्थेकडून व्यसनमुक्ती केंद्र चालविण्यात येते. गुळमिरे आणि सावळे यांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. बुधवारी (३१ ऑगस्ट) सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाले.

सावळेने गुळमिरेचा टॅावेलने गळा आवळून खून केला, असे सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सावळेला ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशीरा सिंहगड पोलीस ठाण्यात सावळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, एप्रिल महिन्यात नऱ्हे भागातील एका व्यसनमुक्ती केंद्रात किरकोळ वादातून सहकाऱ्याने एका तरुणाचा काचेने गळा चिरुन खून केल्याची घटना घडली होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *