पुणे : वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीला गती ; १४२ कोटींच्या खर्चाला मान्यता

पुणे : महापालिकेच्या प्रस्तावित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या उभारणीच्या कामांनी वेग घेतला आहे. महापालिका स्वखर्चाने रुग्णालयाची इमारत उभारणार असून त्यासाठी १४२ कोटींच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णालय उभारणीच्या कामांसाठीची निविदा काढण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्याला केंद्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास आणि महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली. महाविद्यालय चालविण्यासाठी महाालिकेने धर्मादाय आयुक्तांकडे शिक्षण ट्रस्टची नोंदणी केली. यामध्ये महापौर आणि सर्व पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष हे ट्रस्टवर पदसिद्ध सदस्य आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी एकूण ६५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका घेऊ शकत नाही. त्यामुळे हे महाविद्यालय प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र त्यावरून वाद झाल्यानंतर महापालिकेकडूनच इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी ऑगस्ट महिन्यात १४२ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली होती. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

डाॅ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात महाविद्यालयाची इमारती उभारण्यात येणार आहे. त्यासाठी डाॅ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाचे बाणेर येथे तात्पुरते स्थलांतर केले जाणार आहे. रुग्णालयाची इमारत महापालिका उभारणार असली तरी वसतिगृह पीपीपी तत्त्वावर उभारण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply