पुणे: वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं दाखवलं आमिष; डॉक्टर महिलेसह दोघींना ३२ लाखांचा गंडा

पुणे शहरातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने डॉक्टर महिलेसह दोघींची ३२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला राजगुरुनगर भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर पाटील (रा. आंबेगाव पठार) आणि स्नेहल पवार (रा. सांगली) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी आरोपी पाटील आणि पवार यांनी तक्रारदार महिलेच्या मुलाला नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवलं होतं. त्यासाठी आरोपींनी फिर्यादी महिलेकडून सात लाख रुपये घेतले होते.

त्यानंतर एका डॉक्टर महिलेच्या मुलाला प्रवेशाचे आमिष दाखवून आरोपी पवार आणि पाटील यांनी २५ लाख रुपये घेतले. वर्षभरानंतर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने त्यांनी आरोपींशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघींनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply