पुणे : विदर्भात ११ मेपर्यंत उष्णतेची लाट; उर्वरित महाराष्ट्रातही तापमानवाढ

पुणे : उत्तर भारतातील काही भागात तापमानात वाढ होत असल्याने विदर्भातही कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. या विभागात ११ मे पर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही या काळात तापमानवाढ कायम राहणार आहे. राज्यातील पावसाळी स्थिती सध्या पूर्णपणे निवळली असून, सर्वच भागात कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश झाले आहे. परिणामी तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील शेजार राज्य असलेल्या मध्य प्रदेशात सध्या उष्णतेची लाट आहे. ती दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. राजस्थानात ८ ते १०, हरियाणामध्ये ९ ते ११, तर पंजाब आणि जम्मू विभागामध्ये १० आणि ११ मे रोजी उष्णतेची लाट राहणार आहे.  विदर्भाकडे येणाऱ्या कोरडय़ा आणि उष्ण वाऱ्यांमुळे या विभागात बहुतांश भागात उष्णतेची लाट राहणार आहे.

अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात प्रामुख्याने तापमानात वाढ होईल. मध्य-उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या तापमानातही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारी (७ मे) उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर आदी भागात ४० ते ४२ अंश तापमान नोंदविले गेले. विदर्भात चंद्रपूरमध्ये ४४ अंश, तर इतरत्र ४१ ते ४३ अंशांवर कमाल तापमान होते. मराठवाडय़ात परभणी, नांदेडमध्ये ४२ अंशांच्या पुढे कमाल तापमानाची नोंद झाली. औरंगाबादचा पारा ४१.५ अंशांवर होता. मुंबई परिसरासह कोकण विभागातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply