पुणे : विक्रम गोखले यांच्या अभिनयाचा वारसा अध्यासानाद्वारे जतन; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे : जवळ ठेवून नव्हे तर विद्या वाटून वाढवता येते, या भावनेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थांसाठी विक्रम गोखले यांनी पुस्तकरूपी जो खजिना सुपूर्द केला आहे. त्याचे जतन करून हा वारसा अभिनयाच्या क्षेत्रात पुढे येऊ पाहणाऱ्या कलाकारांपर्यंत हस्तांतरित होण्याच्या दृष्टिकोनातून तांत्रिक बाजू तपासून पाहण्यात येतील. पुणे विद्यापीठामध्ये अध्यासन सुरू करून विक्रम गोखले यांचा अभिनय वारसा जतन केला जाईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली.

विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा आणि आम्ही कोथरुडकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सभेत पाटील बोलत होते. गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले, संदीप खर्डेकर, सुनील महाजन, मंजुश्री खर्डेकर मंदार जोशी, त्यागराज खाडिलकर, किशोर सरपोतदार, राजेश दामले, मिलिंद कुलकर्णी, विजय फळणीकर, राज काझी, आनंद दवे यांनी गोखले यांच्याविषयींच्या आठवणींना उजाळा दिला.

पाटील म्हणाले की, विक्रम गोखले हे अभिनय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. एक कलाकार म्हणून त्यांचा आलेख सतत चढताच राहिला. त्यांची सामाजिक आणि राजकीय मते परखड होती. त्यांनी त्यांची सामाजिक बांधिलकीही निभावली. तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा लाभला असूनही त्यांनी त्याचा टेंभा मिरवला नाही.

वृषाली गोखले म्हणाल्या की, विक्रम गोखले यांचा घरामध्ये सर्वसामान्य व्यक्तीसारखाच सहज वावर असायचा. पिठलं-भाकरी आणि खर्डा त्याला खूप आवडायचा. अभिनयरूपी विद्यादान करण्यावर त्याचा भर होता.

गोखले यांच्या गेल्या तीन पिढ्यांना मिळलेल्या पारितोषिकांचे दालन निर्माण करण्यासाठी गोखले कुटुंबीयांनी ही स्मृतिचिन्हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे सुपूर्द केली आहेत. हे दालन लवकरात लवकर उभे राहण्यासाठी आणि या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल.

– चंद्रकांत पाटीलपालकमंत्री



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply