पुणे : वानवडीतील भैरोबा नाल्यावरील दिवाळीनंतर जुना पूल पडणार

घोरपडी : वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाइट हाउसिंग सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील साधारण शंभर वर्षे जुना पूल पाडणार आहेत. पावसामुळे भौरोबा नाल्यामध्ये पाणी आले की या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते. यामुळे अनेक अपघात घडले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वतीने २७ ऑक्टोबरला जुना पूल पाडण्यात येणार असून लगेच या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

नवीन पूल साधारण २४ मीटर लांबी व १२ मीटर रुंदीचा असून जुन्या पूलापेक्षा नवीन पुलाची एक ते दीड मीटरने उंची वाढणार आहेत. हा पूल बांधण्यासाठी पालिकेकडून 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे हा पूल पुन्हा पाण्याखाली गेला होता. पुलावर मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचल्यामुळे मंगळवारी सकाळीपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. सप्टेंबर २०१९ मध्ये भैरोबा नाल्याच्या पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे काही प्रवासी वाहून गेले होते. जोरदार पावसामुळे नेहमी या पुलावरील वाहतूक बंद करावी लागते. हा पूल पुणे कॅन्टोमेंट आणि वानवडी परिसराला जोडणारा महत्वाचा पूल आहे. साधारण दररोज रोज हजार वाहनांची येथून ये- जा होत असते.

पालिकेचे विभागाचे अभियंता गणेश पुराम यांनी सांगितले की, पुराच्या वेळी सध्याच्या पुलावरून साधारण अडीच फूट उंच पाणी वाहत असून, नवीन पूल सध्याच्या पुलापेक्षा उंच बांधण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात पुराचा धोका निर्माण होणार नाही.

पूल तोडल्यानंतर जो पर्यायी मार्ग दिला आहे, त्याची दुरुस्ती करणे गरजेची असून त्याची रुंदी वाढवून डांबरीकरण करावे. नाहीतर नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सामोरे जावे लागेल.

सप्टेंबर २०१९ मध्ये सलीम शेख, व्हिक्टर सांगले व इतर नागरिक या पुलावरून वाहून गेले होते. त्यावेळी जोरदार पावसामुळे पूल पाण्याखाली गेला होता आणि पुलाची संरक्षण भिंत तुटल्याने पाण्याचा अंदाज आला. तेव्हा पुलावरील संरक्षण भिंतीची किरकोळ दुरुस्ती केली होती, परंतु दरवेळी पावसात पुलाखाली कचरा, प्लॅस्टिक अडकल्याने पाण्याचा प्रवाह रोखला जाऊन पाणी पुलावरून वाहत असते. नवीन पूल झाल्यास वानवडीकरांची ही कायमची समस्या सुटेल अशी आशा आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply