पुणे / लोणावळा :  सुट्टीमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी ; सोलापूर, नगर, मुंबई-बंगळूरु महामार्गावर वाहतूक विस्कळीत

पुणे / लोणावळा : दिवाळीनिमित्त पुणे-मुंबईत स्थायिक झालेले नोकरदार मूळगावी रवाना झाले आहेत. खासगी वाहन तसेच प्रवासी वाहने मोठय़ा संख्येने महामार्गावर आल्याने वाहतुकीचा वेग संथ झाला असून शनिवारी सकाळपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली. खंडाळा घाट, खालापूर, उर्से टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. पुणे-सोलापूर, नगर, मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर वर्दळ वाढल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

दिवाळी सुट्टीमुळे नोकरदाराची मूळगावी जाण्याची लगबग सुरू झाली. शनिवारी (२२ ऑक्टोबर) सकाळपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, पुणे-सोलापूर, नगर, मुंबई-बंगळुरु महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली. खंडाळा घाट, खालापूर, उर्से टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अनेक जण सहकुटुंब पर्यटनासाठी जातात. मंगळवारपासून (२५ ऑक्टोबर) महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.

द्रुतगती मार्गावर खंडाळा घाट परिसरात अवजड वाहने बंद पडून वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने महामार्ग पोलिसांनी घाटक्षेत्रात बंदोबस्त ठेवला आहे. दुर्घटना घडल्यास किंवा कोंडी दूर करण्यासाठी घाटक्षेत्रात वाहने बाजूला काढून त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी आयआरबी, महामार्ग पोलिसांची पथके ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. पुण्याहून नगर, सोलापूर तसेच सांगली, सातारा, कोल्हापरकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ वाढली आहे. पुणे शहरातून महामार्गावर पोहोचण्यासाठी वाहनचालकांनी एक ते दीड तास लागत आहे. नगर रस्त्यावरील वाघोली, सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर परिसरात वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने खेड-शिवापूर परिसरात वाहतूक विस्कळीत झाली.

वाहनचालकांनी शिस्त पाळावी : द्रुतगती मार्गावर घाट क्षेत्रात वाहतूक नियोजनासाठी महामार्ग पोलिसांकडून पथके तैनात करण्यात आली आहेत. वाहनचालकांनी मार्गिकेची शिस्त पाळावी तसेच भरधाव वाहने चालवू नयेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खालापूर टोल नाका ते बोरघाटात वाहने धिम्या गतीने जात होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply